फलटण तालुक्यात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढला ; २१६ जनावरांना लागण तर १८ मृत्यू
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ - फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात लम्पीचा संसर्ग वाढला आहे, सध्या लंपी या रोगाचा प्रादुर्भाव तालुक्यामध्ये २१ ठिकाणी आहे. २१६ जनावरांना या रोगाची लागण झालेली असून एकूण १८ जनावरांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ३९ हजार ९१५ जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. बाधित क्षेत्र आणि अबाधित क्षेत्र यामध्ये लसीकरण करण्याबाबत प्रशासनाच्या सूचना प्राप्त झाल्या असून, प्राधान्याने बाधित क्षेत्रातील जनावरांना लसीकरण करून, नंतर अबाधित क्षेत्रात लसीकरण करण्यात येत आहे. फलटण तालुक्यातील सोनवडी खु., आसु, जिंती, फडतरवाडी, खराडेवाडी, साखरवाडी, चव्हाणवाडी, मुरुम, होळ, तरडगाव, कुरवली बु. येथील गाय, बैल व कालवड या प्रकारातील जनावरे लम्पीने दगावली आहेत.
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यक महाविद्यालय शिरवळ येथील पशुवैद्यक यांनी लसीकरण आणि उपचार मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला आहे. शासन स्तरावरून रिक्त दवाखाने या ठिकाणी पशुवैद्यकांची नेमणूक करण्यात आली असून प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रांमध्ये विषय तज्ञ पशुवैद्यकांची नेमणूक करून बाधित जनावरांवर मोफत उपचार करण्यात येत आहे. तसेच वाई व जावली तालुक्यातून पशुवैद्यकांचे फलटण तालुक्यात लसीकरण व उपचारासाठी सेवा घेण्यात येत आहे. मोफत लसीकरण आणि मोफत उपचार शासकीय यंत्रणेमार्फत दिले जात आहेत. तज्ञ प्राध्यापक यांचे प्रादुर्भाव क्षेत्रात भेट दिली असून उपचाराबाबत मार्गदर्शन केले असून उपचार पद्धतीचा अवलंब केला जात आहे.
जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार १६५ खाजगी पशुधन पर्यवेक्षक यांना शासकीय यंत्रणेशी समन्वय साधून लसीकरण करणे बाबत आदेशित केले आहे. प्रत्येक जनावर तीन रुपये लसीकरण मानधन त्यांना देण्यात येणार आहे त्यानुसार त्यांचे सहकार्य मिळत असून सर्वांनी सहभाग नोंदविल्यास लसीकरण तत्काळ पूर्ण होईल. ग्रामपंचायत स्तरावर यापूर्वीच सरपंच/ ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी यांनी जनावरांची गोठ्यात व इतरत्र कीटकनाशकांची फवारणी करणे बाबत आणि बाधित जनावर आढळल्या बाबत तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधने बाबत आव्हान केले आहे, तसेच रोगाची माहिती बाबत दवंडी देऊन जनजागृती करणेबाबत कळविले आहे. तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय फलटण येथे मोफत रक्त तपासणी तसेच गरीब पशुपालक यांचेसाठी ओमेगा लॅबोरेटरी लोणंद येथे सुद्धा रक्त तपासणी बाबत सहकार्य मिळत आहे.
प्रादुर्भावक्षेत्रास डॉक्टर ए.टी. परिहार जिल्हा पशुवर्धन उपायुक्त, डॉ. संजय शिंदे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, डॉ. सुनील लहाने, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा पुणे, डॉ. व्ही. टी. पवार सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, डॉ.एन.बी.फाळके पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांनी इपिकसेंटर व प्रादुर्भाव क्षेत्र यांना वारंवार भेटी देऊन उपचार, लसीकरण, पशुपालकांनी घ्यावयाची काळजी मार्गदर्शन करीत आहेत.
पशुपालकांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी सदर रोगाची लक्षणे आपल्या जनावरांमध्ये दिसल्यास आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शासकीय यंत्रणेशी संपर्क साधून मोफत उपचार करून घेणे बाबत आवाहन करण्यात येत आहे. अपुरे मनुष्यबळ असूनसुद्धा जिल्ह्यातील पशुवैद्यक, क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ यांचे सहकार्याने पशुसंवर्धन विभाग या रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहे.
No comments