फलटण येथे तालुकास्तरीय फेरफार अदालतीचे आयोजन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -दि. २२ : महसूल खात्यांतर्गत फलटण तालुकास्तरीय फेरफार अदालतीचे आयोजन उद्या शुक्रवार दि. २३ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत अधिकार गृह इमारतीमधील प्रांत कार्यालयालगतच्या, दरबार हॉल मध्ये आयोजित करण्यात येत असून फलटण तालुक्यातील संबंधीत शेतकरी व अन्य नागरिकांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी केले आहे.
या फेरफार अदालतीच्या माध्यमातून महसूल खात्याकडील प्रलंबीत कामाचा निपटारा करण्यात येणार असून प्रामुख्याने मुदत पूर्ण झालेले सर्व प्रलंबीत फेरफार निकाली काढण्यात येतील, नवीन फेरफारासाठी अर्ज करता येईल, ॲानलाईन फेरफार नकला तात्काळ देण्यात येतील, मयत खातेदारांच्या वारस नोंदी घेण्यात येतील, फेरफारासंबंधी सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
या फेरफार अदालतीसाठी महसूल खात्यांतर्गत फलटण तालुक्यातील सर्व महसूल मंडलाधिकारी, गाव कामगार तलाठी उपस्थित राहणार असून आपल्या आवश्यक कागद पत्रांसह उपस्थित राहुन लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार समीर मोहन यादव यांनी केले आहे.
No comments