अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे, आपदग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे श्रीमंत रामराजे यांचे निर्देश
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ - फलटण शहर व तालुक्यात अतिवृष्टीने शेती व शेतकऱ्यांचे आणि रहिवाशांचे मोठे नुकसान झाले असून सर्व शासकीय यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवून आपदग्रस्तांना तातडीने मदत, नुकसानीचे पंचनामे, वाहतूकीबाबत निर्माण झालेल्या अडचणी दूर करणे याला प्राधान्य द्यावे अशा स्पष्ट सूचना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सर्व शासकीय यंत्रणांना दिल्या आहेत.
फलटण शहर, तालुका आणि कोरेगाव तालुक्यातील अतिवृष्टी बाधीत भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी येथील शासकीय विश्राम धाम येथे आयोजित आढावा बैठकीत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी आ. दिपकराव चव्हाण, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी संजय गायकवाड, गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार, तालुका कृषी अधिकारी सागर डांगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता होसे यांच्या सह अन्य संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
बाणगंगा नदीसह तालुक्यातील सर्वच ओढया नाल्यांना आलेल्या प्रचंड पुरामुळे जमिनीची धूप, शेताच्या बांधबंदिस्तीचे नुकसान, पुरामुळे काही ओढ्याच्या पात्रात बदल झाल्याने रस्ते व पुलांचे नुकसान झाले आहे, परिणामी सकाळी शहराकडे दूध, भाजीपाला घेऊन येणारे शेतकरी, नोकरदार, शालेय विद्यार्थी, रुग्ण वगैरे घटकांची कुचंबना होत असून त्यांना तातडीने रस्ते दुरुस्त करुन वाहतूक सुरळीत करुन द्यावी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पोलिस पाटील यांनी आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी राहुन आपदग्रस्तांना दिलासा द्यावा, तसेच नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन अहवाल शासनास त्वरित पाठवावा म्हणजे नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होणार नाही असे मत यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
सर्व शासकीय यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवून नुकसान ग्रस्त शेतकरी व अन्य घटकांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई तातडीने मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाय योजना तातडीने करावी अशा सूचनाही यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सर्व यंत्रणांना दिल्या आहेत.
बाणगंगा धरण फार जुने असून त्याची प्रत्यक्ष पाहणी करुन आवश्यक उपाय योजना तातडीने कराव्यात, योग्य ती काळजी या जुन्या व मातीच्या धरणाबाबत तातडीने निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.
अतिवृष्टी आणि ओढ्यानाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी काही काळ संपर्क तुटत असल्याने त्याबाबतही योग्य दक्षता घेऊन सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे अशा सूचनाही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिल्या आहेत.
पाऊस आणखी किती दिवस पडेल, किती पडेल याबाबत कोणीही काही सांगू शकणार नाही त्यासाठी आत्ताची पूर परिस्थिती आणि संभाव्य पाऊस व येणारे पूर याबाबत विचार करुन सर्व शासकीय यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवून आवश्यक उपाय योजना कराव्यात, सतत पाऊस, बदलते हवामान यामुळे साथीचे आजाराबाबत योग्य सर्वेक्षण करुन त्याबाबतही आवश्यक उपाय योजना करण्याबाबत गटविकास अधिकारी व नगर परिषद मुख्याधिकारी यांनी स्वतंत्र यंत्रणा राबवावी अशी अपेक्षा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केली.
अतिवृष्टीमुळे सांडपाणी वाहून नेणारी गटारे तुडुंब भरल्याने पाणी शहरातील रस्त्यावर साठत आहे तसेच बाणगंगा नदी फलटण शहरातून वाहत असल्याने त्याचे पडसाद थेट शहरामध्ये तातडीने उमटत असतात याबाबत नगर परिषद मुख्याधिकारी यांनी सुद्धा सतर्क राहुन योग्य त्या उपाय योजना तातडीने कराव्यात असे स्पष्ट निर्देश यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले आहेत.
फलटण तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये नियुक्त शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी त्या ठिकाणीच उपस्थित रहावे. त्याबाबत योग्य ते आदेश संबंधीत खात्याच्या माध्यमातून देण्यात यावेत. तालुक्यातील सर्व गावांचा आढावा घेवून प्रत्येक ठिकाणी तातडीने पंचनामे करण्यात यावेत असे यावेळी आ. दीपकराव चव्हाण यांनी स्पष्ट केले.
फलटण विधान सभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव तालुक्यातील भागातही ज्या प्रमाणे शासकीय यंत्रणा फलटण तालुक्यात समन्वय ठेवून काम करीत आहेत त्याचप्रमाणे कोरेगाव तालुक्यात सुद्धा यंत्रणेने काम करावे. कोरेगाव तालुक्यात ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे अश्या ठिकाणी तातडीने पंचनामे करण्यात यावेत, असे निर्देश श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कोरेगावच्या प्रांताधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना दूरध्वनीद्वारे यावेळी दिले.
No comments