Breaking News

पोलीस पाटलांची कामगिरी; ग्रामसुरक्षा दलाचे मदतीने पकडले दोन सराईत गुन्हेगार

अटक करण्यात आलेल्या आरोपींसमवेत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी

Performance of Police Patils; Two criminals arrested with the help of village security forces

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २४ : आंदरूड ता. फलटण येथे एका परप्रांतीय फिरस्ता कापड विक्रेत्यास मारहाण करुन त्याच्याकडून ८० हजाराचा ऐवज लूटून पळून जाणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना पोलिस पाटलांनी ग्राम सुरक्षा दलाच्या सहकार्याने जावली ता. फलटण येथे मुद्देमालासह पकडले आहे. सदर गुन्हेगार हे सराईत असुन त्यांच्यावर लोणंद, फलटण ग्रामीण, वडगाव व सातारा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान  या कामगिरीबद्दल पोलिस पाटील हणमंत हरिहर व भरत मोरे यांचा व ग्राम सुरक्षा दलाचा पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात विशेष सत्कार केला. 

        याबाबतची माहिती अशी की, शुक्रवार दि. २३ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भुपेष जनार्दन साह मूळ रा. बनियाडीह गोड्डा झारखंड हल्ली रा. स्वागत लॉज, फलटण हा फिरुन कपडे विक्री करणारा फिरस्ता व्यापारी फलटणला येण्यासाठी आंदरुड येथील केसरकर वस्ती फाटा येथे थांबला होता. त्यावेळी एमएच ११ डीसी ४६५६ या मोटारसायकलवरुन आलेल्या सागर शिवा काळे रा. वडगाव ता. फलटण व सनी चरण शिंदे उर्फ पवार रा. इंदिरानगर झोपडपट्टी, तासगाव जि. सांगली या दोन सराईत गुन्हेगारांनी त्याच्यावर चाकूचा घाव घालून त्याच्याकडील तिस हजार रुपयांची रोख रक्कम व पन्नास हजार रुपयांचे ड्रेस मटेरीयलच्या मालाचे गाठोडे असा एकुण ऐंशी हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. यानंतर भुपेष याने केलेला आरडाओरडा ऐकुण आंदरुड गावचे पोलिस पाटील हणमंत हरीचंद्र हरीहर हे तेथे आले व घटनेचे गांभीर्य व चोरटे फलटणकडे पळाल्याचे लक्षात घेवून त्यांनी या मार्गावरील पुढील जावली गावचे पोलिस पाटील भरत विठ्ठलराव मोरे यांना झालेल्या घटनेची माहिती देत सदर चोरटे जावलीकडे येत असल्याची माहिती दिली. त्यानुसार मोरे यांनी गावातील ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांच्या मदतीने जावली गावातील एका हॉटेल जवळ जीवाची पर्वा न करता संबंधित चोरट्यांना पकडले व त्यांच्याकडील मुद्देमाल ताब्यात घेवून सदर प्रकाराची माहिती फलटण पोलिस ठाण्यात कळविली. सदर माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी हजर झाले व त्यांनी मुद्देमाल ताब्यात घेवून आरोपींना अटक केली. 

No comments