फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती स्मार्ट प्रकल्पांतर्गत विभागात द्वितीय तर जिल्ह्यात प्रथम
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ५ : महाराष्ट्र शासन पणन संचालनालयाच्या स्मार्ट प्रकल्पांतर्गत राज्यातील ३०५ बाजार समित्यांची सन २०२१ - २२ या वर्षाची विविध निकषांनुसार क्रमवारी (रँकिंग लिस्ट) पणन संचालनालय, पुणे यांनी दि. १ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली असून त्यामध्ये कोल्हापूर पणन विभागात फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती द्वितीय आणि सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असल्याने या बाजार समितीचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे. या बाजार समितीने राज्यस्तरावर ३८ वा आणि विभागात सांगली बाजार समिती नंतर दुसरे स्थान पटकावले आहे.
महाराष्ट्र शासन पणन संचलनालया मार्फत सदर स्मार्ट रँकिंग लिस्ट तयार करताना बाजार समितीने उपलब्ध करुन दिलेल्या पायाभूत सुविधा व इतर सेवा सुविधा,आर्थिक कामकाज, वैधानिक कामकाज यासह अन्य कामकाज विषयक निकष विचारात घेऊन सहकार व पणन विभागाकडून स्वतंत्ररित्या मूल्यांकन करुन राज्य व विभागस्तरीय रँकिंग लिस्ट जाहीर करण्यात आली आहे.
फलटण कृषि उत्पन्न बाजार समिती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपकराव चव्हाण, बाजार समितीचे माजी चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे मार्गदर्शनाखाली काम करणारी बाजार समिती आहे.
या बाजार समितीचे माजी चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांचे कल्पक दृष्टीकोनातून आणि सर्व सहकारी संचालक मंडळ, सचिव यांना सोबत घेऊन शेतकरी कष्टकरी यांचे हितास्तव काही धाडसी व विधायक धोरणात्मक निर्णय घेतले. सदर निर्णयाची प्राधान्य क्रमाने अंमलबजावणी बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर आणि त्यांचे सहकारी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी समन्वय व उत्तम टीम वर्कचे माध्यमातून यशस्वीरित्या केली आहे.
फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करणारे सर्व शेतकरी, आडते, खरेदीदार व्यापारी, हमाल, मापाडी, वाहनचालक व इतर घटक बाजार समितीचे माजी चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, माजी व्हा. चेअरमन भगवानराव होळकर व सहकारी सर्व संचालक मंडळ, सचिव व कर्मचारी वृंद आणि शेतकरी व अन्य घटकांच्या उचित समन्वयातून बाजार समितीच्या विकासाचा आलेख चढता राहिल्याचे दिसून येते.
बाजार समितीच्या सततच्या कामकाजामध्ये पणन मंडळाचे विभागीय उप सरव्यवस्थापक, सुभाष घुले, कोल्हापूर, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) सातारा मनोहर माळी, सहाय्यक निबंधक, (सहकारी संस्था) फलटण सुनिल धायगुडे यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन बाजार समितीला नेहमीच लाभले आहे.
शेतकरी हितास्तव कामकाज करत, जिल्ह्यात व विभागात अव्वल स्थान निर्माण करुन बाजार समिती अधिक लोकाभिमुख होत असलेने श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व त्यांचे सर्व सहकारी यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
No comments