मातृत्वाचा सन्मान हा अभिमान
नोकरी करणारी असो अथवा गृहिणी. सर्वच महिला कुटुंबाची सर्व जबाबदारी सांभाळताना, कुटुंबासाठी झिजताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. ग्रामीण, शहरी, झोपडपट्टी भागात राहणाऱ्या सर्व महिलांची स्थिती सारखीच असते. तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीच राज्यातील मातांसाठी 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियान राबविण्यात येत आहे.
नवरात्रीच्या निमित्ताने हे अभियान घेण्यात येत असून 18 वर्षावरील सर्व महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. सर्वांगीण आरोग्य तपासणी, समुपदेशन आणि आवश्यकता असल्यास उपचार अशा तीन भागात हे अभियान राबविण्यात येईल. या अभियानात महिला, गरोदर स्त्रीयांना प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. सुरक्षित आणि सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशनाच्या माध्यमातून भविष्यात महिलांचे आरोग्य उत्तम राखण्यास निश्चितच मदत होईल.
'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' या अभियानाला 26 सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे. या काळात सकाळी 9 ते दुपारी 2 दरम्यान वैद्यकीय अधिकारी आणि स्त्रीरोग तज्ञांमार्फत 18 वर्षावरील महिला, नवविवाहीत, गरोदर माता यांची तपासणी, औषधोपचार, सोनोग्राफी आणि समुपदेशन करण्यासाठी शिबीरे आयोजित करण्यात आली आहेत. 30 वर्षावरील महिलांचे कर्करोग, मधूमेह, उच्च रक्तदाब, मोतीबिंदू,कान,नाक व घसा तसेच इतर आजारांचे निदान व आवश्यकतेनुसार उपचार, समुपदेशन करण्यात येत आहे.
दोन दिवसात 2.5 लाख तपासण्या
अभियानाच्या दोन दिवसात सुमारे 2 लाख 45 हजार महिलांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 9 हजार 617 महिलांना मधूमेह तर 12 हजार 778 महिलांना उच्च रक्तदाब आढळून आला. तसेच 31 हजार 335 गरोदर महिलांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2 हजार 459 महिलांना उच्च रक्तदाब आढळून आला. तर तीव्र रक्तक्षय असलेल्या 2 हजार 757 मातांना आयर्न सूक्रोज देण्यात आले. 3 हजार 233 मातांची सोनोग्राफी करण्यात आली. यादरम्यान 28 हजार 719 जणांना मानसिक आरोग्य, तंबाखू याबाबत समुपदेशन करण्यात आले.
60 वर्षावरील 5 हजार 98 महिलांची नेत्रतपासणी करण्यात आली. तर 60 वर्षावरील 7 हजार 74 महिलांची कान, नाक, घसा तपासणी करण्यात आली. गर्भ धारणापूर्व सेवा कार्यक्रमांतर्गत 18 हजार 210 महिलांची तपासणी तर 28 हजार 111 महिलांचे तंबाखू व मद्यपान सेवनामुळे गर्भधारणेस होणाऱ्या धोक्यांबाबत, समतोल आहाराबाबत समुपदेशन करण्यात आले.
आभा ओळखपत्र
ग्रामीण भागातील नागरिकांना तात्काळ आरोग्य सुविधा देण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. नियंत्रण कक्षाला 104 क्रमांकावर संपर्क करताच अर्ध्या तासात आरोग्य कर्मचारी रुग्णापर्यंत पोहोचेल आणि प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी नेण्यात येईल. महिलांना 'आभा' आरोग्य ओळखपत्र देण्यासोबत आरोग्य कर्मचाऱ्यांना टॅब देण्यात येणार आहे. महिलेच्या आरोग्याबाबत सर्व माहिती या टॅबमध्ये संकलित करण्यात येईल व त्याला पुढील टप्प्यात आरोग्य ओळखपत्राशी जोडण्यात येईल. त्यामुळे रुग्णांवर उपचार करणे अधिक सुलभ होईल.
राज्यातील साडेतीन कोटी माता-भगिनींची आरोग्य तपासणी 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार असून या अभियानाच्या माध्यमातून महिला आरोग्याच्या संदर्भात महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेण्याचा विश्वास राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत अभियानाच्या उद्धाटनप्रसंगी व्यक्त केला. महिलांसाठी हे अभियान खुपच उपयुक्त आहे.
या शिबिरामध्ये अतिजोखमीच्या मातांचे, महिलांचे निदान करुन त्यांना आवश्यकतेनुसार उपचार आणि संदर्भ सेवा देण्याचे तसेच जास्तीत जास्त महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या कालावधीत मानवविकास कार्यक्रमांतर्गत तज्ञांची शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. तसेच भरारी पथकामार्फत देखील त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये सेवा पुरविण्यात येत आहेत. स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत अधिक सतर्क राहून महिलांनी यात सहभागी होऊन आरोग्य तपासणी व उपचार करुन घ्यावेत.
संकलन : विभागीय माहिती कार्यालय,पुणे
No comments