महाराष्ट्र बास्केटबॉल संघ देशपातळीवर विजयी होईल - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
![]() |
स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या कुमार व कुमारी संघांना पारितोषिक वितरणानंतर त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा देताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व अन्य मान्यवर |
राज्यस्तरीय अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेत कुमार गटातून मुंबई उपनगर विजयी, तर कुमारी गटातून पुणे विजयी
कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे पारितोषिक वितरण श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते संपन्न
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १७ : अंतीम सामन्यात प्रचंड उत्कंठा होती, खेळ पहात असताना आपल्याला प्रचंड आनंद वाटल्याचे नमूद करीत सोलापूर जिल्ह्यात बास्केट बॉलची परंपरा सांगोल्यापासूनच सुरु झाली असावी असे सांगत, महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यातून आलेल्या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करताना या स्पर्धेत कोण जिंकले, कोण हरले यापेक्षा आपण दाखविलेला उत्कृष्ट खेळ ही अत्यंत महत्त्वाची बाब असते. या स्पर्धेमधूनच महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार असून महाराष्ट्र संघ देशपातळीवर जिंकून येईल अशा शुभेच्छा महाराष्ट्र खो - खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केल्या.
![]() |
पारितोषिक वितरण समारंभात बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर |
सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४१ व्या स्मृती समारोहानिमित्त आणि त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, महाराष्ट्र बास्केट बॉल असोसिएशन, सांगोला तालुका बास्केटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त सहभागाने आयोजित राज्यस्तरीय कुमार व कुमारी अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धा दि. ११ सप्टेंबर पासून विद्यामंदिरच्या प्रांगणात सुरु होत्या. या स्पर्धेत कुमार गटातून मुंबई उपनगर संघाने अजिंक्यपद पटकावले तर पुणे जिल्ह्याने उप विजेतेपद पटकावले आणि कुमारी गटातून पुणे जिल्ह्याच्या संघाने अजिंक्यपद पटकावले तर नागपूरच्या संघाने उपविजेतेपद पटकावले.
कुमारी गटातून कोल्हापूर संघाने तिसरा क्रमांक पटकावला तर चतुर्थ क्रमांकावर मुंबई उपनगर यांना समाधान मानावे लागले. कुमार गटातून नागपूर संघाने तृतीय क्रमांक पटकावला तर रायगड जिल्ह्याने चतुर्थ क्रमांक पटकावला.
या स्पर्धेतील पारितोषिक वितरण समारंभासाठी महाराष्ट्र खो - खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या समवेत आलेले उद्योगपती राम नाईक निंबाळकर, डॉ. पुरुषोत्तम राजवैद्य , मुधोजी महाविद्यालय फलटणचे प्रा. शंभुराजे नाईक निंबाळकर आणि सोलापूर जिल्हा सहाय्यक नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे जनरल मॅनेजर प्रशांत सुजी, सांगोला तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, फॅबटेक उद्योग समूहाचे विश्वस्त भाऊसाहेब रुपनर, सिंहगड कॅम्पसचे डायरेक्टर अशोक नवले, सांगोला महाविद्यालय प्राचार्य मधुसूदन बचुटे, सचिन मठपती, अनिल कांबळे, तात्यासाहेब केदार, अभिजीत नलवडे, चेतनसिंह केदार, निवृत्त उपअभियंता महादेव गायकवाड, झपके कुटुंबीय यांच्या सह क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.
![]() |
खेळाडूंची ओळख करुन घेऊन त्यांना शुभेच्छा देताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व अन्य मान्यवर |
सामना सुरु होण्यापूर्वी क्रीडा शिक्षक सचिन चव्हाण व सुभाष निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेतील विद्यार्थ्यांनी अप्रतिम मल्लखांबाचे प्रात्यक्षिक सादर केले. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत अंतिम सामन्यात खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या, त्यानंतर अंतिम सामन्याला सुरुवात झाली. तत्पूर्वी कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात स्पर्धांचे नियोजन, सहभागी संघ आणि संपूर्ण स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व संस्थांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. आपल्यामुळे या स्पर्धा घेणे शक्य झाल्याचे नमूद करताना पावसामुळे थोडा व्यत्यय आला, पण तरीही सर्व खेळाडू अत्यंत चुरशीने सर्व सामने खेळल्याबद्दल समाधान व्यक्त करीत सर्वांना पुढील खेळासाठी त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
निवड समितीचे सदस्य जयंत देशमुख, एम शफी सर, आकाश बनसोडे, नितीन चपळगावकर तर सामन्यासाठी पंच म्हणून काम केलेले सर्व पंच, या संपूर्ण स्पर्धेसाठी मार्गदर्शन करणारे प्रशांत मस्के, सांगोला तालुका बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आयुब मन्यार, प्रसाद सपाटे, तेजस बोत्रे या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा समन्वयक व क्रीडा विभाग प्रमुख सुनील भोरे, आयुब मन्यार, प्रा. धनाजी चव्हाण यांनी केले, समारोप व आभार प्राचार्य भीमाशंकर पैलवान यांनी मानले.
No comments