पंतप्रधान फसल बीमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
सातारा दि. 24 : नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग इ. कारणाने पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांचे स्थैर्य अबाधित राखण्यासाठी शासनाने रब्बी हंगामासाठी पंतप्रधान फसल बीमा योजना पुढे सुरु ठेवण्यास मान्यता दिली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी दिली.
जिल्ह्यातील तालुकानिहाय, महसूल मंडलनिहाय पिके व क्षेत्र अधिसूचित केली असून त्याप्रमाणे गहू बागायत, रब्बी ज्वारी बागायत, र. ज्वारी जि., हरभरा, रब्बी कांदा व उन्हाळी भुईमूग या सहा पिकांसाठी जिल्ह्यामध्ये ही योजना लागू आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी रब्बी ज्वारी पीकासाठी दि. 30 नोव्हेंबर 2022 तर गहू, हरभरा व कांदा पीकासाठी दि. 15 डिसेंबर २०२२ व उन्हाळी भूईमूग पीकासाठी दि. 31 मार्च 2023 ही अंतिम मुदत आहे.
कर्जदार बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येईल. ही योजना ऐच्छिक असल्याने शेतकऱ्यांना ज्या शेतातील अधिसूचित पिकाचा विमा उतरावयाचा आहे, त्या शेताचा 7/12 उतारा व खाते उतारा (8 अ) घेऊन ज्या राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते आहे त्या बँकेत आपला विमा हप्ता भरावयाचा आहे. तसेच सार्वजनिक सुविधा केंदामार्फत व विमा कंपनीच्या संकेत स्थळावरुनही विमा हप्ता भरण्याची सुविधा आहे. 7/12 उतारा प्राप्त होत नसल्यास शेतात अधिसूचित पीक असल्याचे स्वयं घोषणापत्र जोडणे आवश्यक आहे.
अधिक महितीसाठी गाव पाातळीवरील कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी
यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.
No comments