फलटण - सातारा रस्त्यावरील दिशादर्शक फलक : शहरवासीयांची डोकेदुखी
फलटण - सातारा रस्त्यावर लावण्यात आलेला दिशादर्शक फलक |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : फलटण - सातारा रस्त्यावर बाणगंगा नदीवरील पुलाशेजारी सार्वजनिक बांधकाम खात्याने वाहन चालक, प्रवाशी यांना मार्गदर्शन करण्यासाठी उभारलेला दिशादर्शक फलक चुकीचा असल्याचे निदर्शनास आणून देवूनही त्यामध्ये आवश्यक सुधारणा न केल्याने वाहन चालक, प्रवाशी यांच्या सह शहरवासीयांसाठी तो त्रासाचा ठरत आहे.
फलटण - सातारा रस्ता शहरातून जात असताना त्यावर असलेला वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन सुमारे ३० वर्षांपूर्वी शहराबाहेरुन रिंग रोड काढून शहरातून होणारी वाहतूक वळविण्यात आल्याने शहरातील वाहतुकीची कोंडी, अपघात, वाहन धारकांमधील सततच्या तक्रारी दूर झाल्या होत्या मात्र आता सार्वजनिक बांधकाम खात्याने उभारलेल्या या दिशादर्शक फलकामुळे सातारा बाजूकडून येऊन पंढरपूर कडे जाणारी वाहने बाणगंगा नदीवरील पुल ओलांडल्यानंतर उजवी कडे वळून रिंग रोडने पुढे जात आहेत, मात्र बारामती कडे जाणारी वाहने उजवीकडे न वळता सरळ शहरात जात असल्याने ३० वर्षांपूर्वी वाहतुकीस छोटा असणारा शहरातून जाणारा तो रस्ता आजच्या स्थितीत प्रचंड वाढलेल्या वाहन संख्येसाठी पुरेसा होत नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
शहरातील बारस्कर गल्ली, मारवाड पेठ भागातील हा अरुंद रस्ता, त्यातच रस्त्यावर असलेले मोठे वळण मोठ्या वाहनांना वळून जाताना त्रासदायक ठरत असताना, रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी, वाहन चालकांमधील वादावादी, संघर्ष आणि रात्री अपरात्री सुरु असलेली प्रचंड वाहतूक, वाहनांचे कर्कश हॉर्नचा आवाज, विशेषतः ट्रक चालकांच्या वादावादीने या भागातील नागरिकांना रात्री शांत झोप नाही, दिवसभर बाहेर पडताना अपघाताची भीती आणि स्वतःची वाहने लावण्यास जागा उरली नसल्याने या भागातील नागरिक अक्षरशः चिंताक्रांत झाले आहेत. त्यातच प्रचंड वाहतुकीने धुळीचे लोट घरात येत असून संपूर्ण फर्निचर, बैठक, कपडे धुळीने माखून जात आहेत.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या यंत्रणेने दुसरा दिशादर्शक फलक लगेच बसविणे शक्य नसेल तर किमान चुकीचा दिशादर्शक फलक त्वरित काढून टाकावा अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
No comments