Breaking News

कोर्फबॉल आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी खेळाडूला श्रीमंत रामराजे यांच्याकडून आर्थिक मदत

लक्ष्मी विलास पॅलेस येथे प्रणव पोमणे या खेळाडूस २५ हजार रुपये देताना आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शेजारी सरपंच बापूराव गावडे व अन्य ग्रामस्थ
     Financial assistance to player for Korfball International Championship by Srimant Ramraje Naik Nimbalkar
    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  : कोर्फबॉल या अनोख्या क्रीडा प्रकारातील आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश फी चे २५ हजार रुपये देवून आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी खटकेवस्ती, ता. फलटण येथील प्रणव पोमणे या खेळाडूची आर्थिक अडचण दूर करुन त्याला स्पर्धेतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
       कोर्फबॉल या अनोख्या क्रीडा प्रकारांमध्ये महाराष्ट्रातील दिशान गांधी, नगर आणि प्रणव पोमणे, खटकेवस्ती, ता. फलटण या दोन खेळाडूंची राष्ट्रीय कोर्फबॉल संघाच्या तिसऱ्या व अंतीम सराव शिबीरासाठी निवड झाली आहे.  हे दोन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय कॉर्फ बॉल फेडरेशन द्वारा आयोजित करण्यात येत असलेल्या आशिया ओशियाना अजिंक्यपद स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय संभाव्य टीम मधून प्रतिनिधीत्व करणार असल्याचे भारतीय कोर्फबॉल असोसिएशनचे सचिव, अबिन थॉमस व्ही. यांनी पत्राद्वारे कळवले आहे. 
      हे सराव शिबीर  २५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत  लवली व्यावसायिक विद्यापीठ, जालंधर, पंजाब येथे आयोजित केले जाणार आहे. 
       सदरचे कोर्फबॉल आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा दि. २८ नोव्हेंबर ते दि. ४ डिसेंबर २०२२ या काळात थायलंड या देशांमध्ये आयोजित केली जाणार आहे. महाराष्ट्रातील निवड झालेल्या वरील दोन्ही खेळाडूंनी या सराव शिबीरास उपस्थित राहण्यासाठी व आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी २५ हजार रुपये प्रत्येकी प्रवासी कंपनीच्या बँक खात्यामध्ये जमा करावयाचे आहेत. तथापि पोमणे सदर रक्कम जमा करु शकत नसल्याने त्याची संधी हुकण्याची संधी लक्षात घेऊन खटकेवस्ती सरपंच बापूराव गावडे यांनी ही बाब आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निदर्शनास आणून देत, मदत करण्याची विनंती केल्यानंतर आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी या खेळाडूस २५ हजार रुपये देवून सराव शिबीर व स्पर्धेत सहभागी होऊन उज्वल यश मिळविण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
      कोर्फबॉल हा क्रीडा प्रकार आपल्याकडे अजूनही फारसा प्रचलित नाही परंतू आंतरराष्ट्रीय पातळीवर या खेळास मोठे महत्त्व व ग्लॅमर प्राप्त झाले आहे. हा नेट बॉल किंवा बास्केटबॉल सदृश्य सांघिक खेळ आहे. यामध्ये ४ पुरुष व ४ स्त्री खेळाडू असलेले संघ विरुद्ध दिशांना चेंडू नेऊन तो ३.५ मीटर उंचीवर लावलेल्या जाळी विरहित बास्केटमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात. इसवी सन १९०२ मध्ये एका डच शिक्षकाने या क्रीडा प्रकाराचा शोध लावला. नेदरलँड या देशांमध्ये आज मितीला साधारण ५०० क्लब व त्या माध्यमातून साधारणत: ९० हजार क्रीडा प्रेमी यामध्ये सहभागी होत असतात. बेल्जियम, तैवान व इतर ७० देशांमध्ये हा क्रीडा प्रकार अत्यंत लोकप्रिय आहे. त्याचा सध्या ऑलिंपिक क्रीडा प्रकारांमध्ये सुद्धा सहभाग झालेला आहे.

No comments