Breaking News

पक्षकारांनी सामंजस्याने व सुसंवादाने जास्तीत जास्त प्रकरणे मिटवावीत - प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे

Parties should resolve as many cases amicably and harmoniously as possible - Chief District and Sessions Judge Mangala Dhote

     सातारा दि. 12 : राष्ट्रीय लोकअदालतीचे   देशभर आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर   जिल्ह्यातही जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघ जिल्हा सातारा यांच्यावतीनेही राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये पक्षकारांनी सामंजस्याने व सुसंवादाने तडजोड करुन जास्तीत जास्त प्रकरणे मिटवावीत, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी केले.

    येथील जिल्हा न्यायालयात   राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या अदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. या उद्घाटन प्रसंगी जिल्हा न्यायाधीश ए.एस. जाधव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव, वकील संघाचे अध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी  यांच्यासह न्यायालयातील न्यायाधीश, वकील, पक्षकार उपस्थित होते.

 राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे निकाली निघावीत यासाठी पक्षकारांचे मनपरिर्वतन करावे. वाद हा सुसंवादातूनच मिटला जातो. या वर्षातील ही शेवटची लोकअदालत आहे. पक्षकारांनी सुसंवादातून जास्तीत जास्त प्रकरणे मिटवावीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनीही लोकअदालतीला चांगला प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी केले.

    राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सर्व प्रकारचे दिवाणी दावे व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली आहेत. जिल्हा न्यायालयात दाखल असलेली विविध प्रकरणे सामंजस्याने मिटावीत म्हणून 10 पॅनल व ऑनलाईन एक पॅनल कामकाजाकरीता आहे.  जिल्ह्यात प्रलंबित सुमारे 9 हजार 310 प्रकरणे चर्चेसाठी ठेवली असल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव यांनी प्रास्ताविकात सांगितले.

No comments