Breaking News

ग्रामपंचायत निवडणूक व यात्रा कालावधीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा -पालकमंत्री शंभूराज देसाई

Proper police arrangements should be maintained during Gram Panchayat elections and Yatra period -Palak Minister Shambhuraj Desai

     सातारा  : जिल्ह्यात होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, तसेच जिल्ह्यात मोठ्या यात्राही होणार आहेत. या निवडणूक व यात्रा कालावधीत  कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची आत्तापासूनच तयारी करावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

   सातारा पोलीस विभागाचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी शिवतेज हॉल येथे घेतला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला कोल्हापूर परीक्षेत्राचे प्र. पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.

   महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पथदर्शी प्रकल्प साताऱ्यात राबविण्यात येत आहे, या कार्यक्रमाला गती देण्यात यावी, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यातील अवैध दारु विक्री बंद झाली पाहिजे यासाठी पोलीस विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तपणे कारवाई करावी. तसेच खासगी सावकारी करणाऱ्यांवरही मोठ्या प्रमाणात कारवाई करावी.

    जिल्हा वार्षिक योजनेमधील 4 टक्के निधी हा पोलीस विभागासाठी राखून ठेण्यात येत आहे. या निधीमधून पोलीस विभागाला आणखीन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या निवासस्थानाचे प्रलंबित प्रश्नही सोडविले जातील.  सातारा पोलीस दलाचे मंत्रालयस्तरावर जे प्रलंबित प्रश्न आहेत तेही तातडीने सोडविले जातील. पालकमंत्री म्हणून पोलीस विभागाला नेहमीच सहकार्य राहील. पोलीस विभागाने सकारात्मक पद्धतीने काम करुन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी नेहमीच प्रयत्नशील रहावे, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

    यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कारही पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.

No comments