ट्रॅक्टर भिंत पाडून घरात घुसला
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 24: फलटण पंढरपूर पालखी मार्गावर विडणी येथे दोन भरधाव वेगाने चाललेल्या ट्रॅक्टर चालकांनी समोरासमोर होत असलेली धडक टाळताना एका ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटून तो रस्त्यालगतच्या घरात घुसला. घरातील सर्व लोक घराबाहेर असल्याने मोठी दुर्घटना टळल्याने 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' आशा प्रतिक्रिया या परिसरातून व्यक्त झाल्या.
घरात घुसलेला ट्रॅक्टर व झालेले नुकसान |
याबाबतची घटनास्थळाहुन मिळालेली माहिती अशी की, दोन ट्रॉल्या असलेला खत वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर क्र. एम एच १३ ए.जे.५३२४ हा फलटणकडे निघाला होता. तर दुसरा नंबर नसलेला ट्रॅक्टर फलटणहुन पिंप्रद बाजूकडे निघाला होता. हे दोन्ही ट्रॅक्टर भरधाव वेगाने चालले होते. विडणी ता. फलटण गावच्या हद्दीत अब्दागिरेवाडी येथे आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास या ट्रॅक्टर चालकांनी समोरासमोर होत असलेली जोरदार धडक चुकविण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळी एका ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याचा ट्रॅक्टर रस्त्यालगत असलेल्या एका घराची भिंत फोडून घरात घुसला. ट्रॅक्टर चालक गुणवंत मोरे यास डोकयास मार लागला तर ट्रॉलीत बसलेला कैलास लवटे हे दोघे जखमी झाले. तर दुसऱ्या ट्रॅक्टर चालकाने तेथून पलायन केले.
दरम्यान संबधित ट्रॅक्टर ज्या घरात घुसला तेथील लोक हे बाहेर कोवळ्या उन्हात थांबले होते. सदर ट्रॅक्टर हा भिंत फोडून घरात शिरला आहे, परंतु घरातील लोक बाहेर असल्याने मोठी दुर्घटना टाळली. त्यामुळे काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशाच प्रतिक्रिया या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केल्या. या निमित्ताने नियमबाह्यपने व वीना नंबरचे ट्रॅक्टर व ट्रॉली चालवणार्यावर गुन्हे दाखल करण्याची मागाणी होत आहे.
No comments