Breaking News

समाजमन घडवण्यासाठी यशवंतरावांचे जिद्दी चारित्र्य तरुणांना सांगावे लागेल - मधुकर भावे ; यशवंतरावांचे विचार तरुणांपर्यंत पाहचविणे गरजेचे - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

मधुकर भावे यांना ‘यशवंतराव चव्हाण साहित्यिक गौरव पुरस्कारा’चे वितरण करताना आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर. सोबत डावीकडून रविंद्र बेडकिहाळ, डॉ.सचिन सूर्यवंशी - बेडके, किशोर बेडकिहाळ, आ.दीपक चव्हाण, दिलीपसिंह भोसले, राजेंद्र शेलार, महेंद्र सूर्यवंशी - बेडके, प्रा.रमेश आढाव. (छाया : बंडू चांगण, फलटण.)

    यशवंतरावांचे विचार तरुणांपर्यंत पाहचविणे गरजेचे - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

    Yashwantrao Chavan Marathi Sahitya Sammelan,Phaltan
    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  : ‘‘यशवंतरावांच्या महाराष्ट्राशी आजच्या महाराष्ट्राची तुलना होऊच शकत नाही. आज अनेक जुन्या परंपरा मोडीत काढल्या जात आहेत. स्पष्ट बोलणारी, लिहीणारी माणसे नाहीत. फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोकांचा राजकारण व समाजकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत आहे. अशा परिस्थितीत चांगल्या विचारांच्या लोकांनी एकत्र येवून ‘यशवंत विचार’ मोठा करणे गरजेचे असून समाजमन घडवण्यासाठी यशवंतरावांचे जिद्दी चारित्र्य तरुणांना सांगावे लागेल’’, असे मत ज्येष्ठ पत्रकार व प्रसिद्ध राजकीय विश्‍लेषक मधुकर भावे यांनी व्यक्त केले. 

    येथील नामदेवराव सूर्यवंशी-बेडके महाविद्यालयात थोर नेते स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई पुरस्कृत श्रीराम एज्युकेशन सोसायटी व श्री सद्गुरु प्रतिष्ठान, फलटण यांच्या सहकार्याने महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा फलटण आयोजित दहाव्या ‘यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलना’च्या समारोपाच्या सत्रात ‘यशवंतराव चव्हाण आणि आजचा महाराष्ट्र’ या विषयावरील व्याख्यानात मधुकर भावे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर होते. व्यासपीठावर फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण, संमेलनाचे अध्यक्ष किशोर बेडकिहाळ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव राजेंद्र शेलार, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रविंद्र बेडकिहाळ, हरणाई सूत गिरणीचे संस्थापक अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, संमेलन स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले, कार्याध्यक्ष डॉ.सचिन सूर्यवंशी - बेडके, म.सा.प.फलटण शाखा अध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, प्रा.रमेश आढाव, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळ सदस्य महेंद्र सूर्यवंशी - बेडके, महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मधुकर भावे यांना आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते ‘यशवंतराव चव्हाण साहित्यिक गौरव पुरस्कार’, तर सातारा येथील ज्येष्ठ पत्रकार जयवंत गुजर यांना मधुकर भावे यांच्या हस्ते ‘यशवंतराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

    मधुकर भावे पुढे म्हणाले, ‘‘सातारा जिल्हा हा एक यज्ञकुंड आहे. श्रीमंत मालोजीराजेंनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना शिक्षण कार्यासाठी 10 एकर जागा देणगी म्हणून दिली. अशी दानशूर माणसे आज राजकारणात कुठेही आढळणार नाहीत. गांधी आहेत पण महात्मा नाहीत, पटेल आहेत पण सरदार नाहीत, आझाद आहेत पण मौलाना नाहीत आणि चव्हाण आहेत पण यशवंतराव नाहीत अशी आजची परिस्थिती बनली आहे. राजकारण्यांनी नाही म्हणावे आणि नोकरशाहीने होय म्हणावे असे यशवंतरावांनी त्यावेळी सांगितले होते. आजचे राजकारणी आणि नोकरशाही दोघेही नाहीच्या भूमिकेत आहेत. यशवंतरावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या बँक खात्यावर आढळलेली अल्पशी रक्कम हे त्यांचे चारित्र्य होते. आज चौकाचौकात फलकांवर शुल्लक कामे करुन वा काहीही कामे न करता स्वत:ला ‘कार्यसम्राट’ म्हणवून घेणारे दिसत आहेत. लोकांच्यावर राजकारणाचा मोठा प्रभाव असल्याने आजचे राजकारणीच लोकांना वाईट सवयी लावत आहेत. संकूचित विचार पेरत आहेत. यातून मूल्य, चारित्र्य, विचार हे बाजूला पडत आहेत. हे बदलण्यासाठी चांगली माणसे शोधावी लागतील. आजच्या पिढीत ‘यशवंत विचार’ रुजवण्यासाठी आपल्याला देहाचा आणि चारित्र्याचा बांध घालावा लागेल,’’ असेही मधुकर भावे यांनी यावेळी स्पष्ट केले. यशवंतराव चव्हाण साहित्यिक गौरव पुरस्काराला उत्तर देताना, ‘‘आजवर आपल्याला अनेक पुरस्कार मिळाले पण आजचा पुरस्कार यशवंतरावांच्या स्मरणार्थ असल्याने हा सर्वोच्च पुरस्कार आहे. तो मी आयुष्यभर मिरवीन’’, असेही मधुकर भावे यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले.

    आ.श्रीमंत रामराजे म्हणाले, ‘‘1991 साली ज्यावेळी पहिले भाषण केले त्यावेळी मी तरुण पिढीच्या गोंधळलेल्या परिस्थितीचा नेता असल्याचे बोललो होतो. आजही तीच परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत यशवंतरावांच्या विचारांचे वैचारिक मंथन तरुणांना भावेल अशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोचवणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानामुळे अभिव्यक्त होण्याची संधी सर्वांना मिळाली आहे. पण यातून चांगले विचार मागे पडू लागल्याने तंत्रज्ञान हे फायद्याचे आहे की तोट्याचे ?असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आज तरुणांच्या सामाजिक, वैयक्तीक गरजा बदलल्या आहेत. तरुण पिढीचे विचार आणि बैठक व्यावसायिकदृष्टीची आहे. त्यामुळे त्यांना वेगळी विचारधनाची जोड देणे गरजेचे असून हीच सामाजिक क्रांतीची पावले ठरतील. हे चांगले विचारधन जर उद्याच्या पिढीमध्ये रुजले नाही तर यशवंतरावांनी आपले आयुष्य वाया घालवले असे खेदाने आपल्याला म्हणावे लागेल’’, असेही आ.श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले.

    यावेळी ‘यशवंतराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कारा’चे मानकरी जयवंत गुजर 91 व्या वर्षीही लेखन कार्य करत असल्याबद्दल आ.श्रीमंत रामराजे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. तसेच ‘यशवंतराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कारा’चे मानकरी मधुकर भावे यांच्याही कार्याविषयी गौरवोद्गार व्यक्त करुन श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा सन 2023 चा ‘श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार’ भावे यांना देणार असल्याचे जाहीर केले.

    संमेलनाध्यक्ष किशोर बेडकिहाळ म्हणाले, ‘‘यशवंतरावांनी महाराष्ट्राच्या विकासाची घडी बसवली. परंतु आज विकास आणि संस्कृती यामध्ये अंतर निर्माण होवून सांस्कृतिक महाराष्ट्राची झपाट्याने अधोगती सुरु आहे. राजकारण्यांची पत्रकार, साहित्यिक, नोकरशाही यांच्याशी सांगड जुळून समाजजीवनाचे चित्र राजकारण्यांच्या पंखाखाली आले आहे. हे महाराष्ट्राला साजेसे नसून याची उकल होणे आवश्यक आहे.’’

    यावेळी म.सा.प.फलटण शाखेच्यावतीने घेण्यात आलेल्या खुल्या निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सतीश जंगम व सौ.हेमलता गुंजवटे यांनी केले. आभार प्राचार्य शांताराम आवटे यांनी मानले. 

    यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद, श्रीराम एज्युकेशन सोसायटी, श्री सद्गुरु व महाराजा संस्था समूहाचे पदाधिकारी, सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यप्रेमी नागरिक उपस्थित होते.

No comments