Breaking News

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना सुरू करणार – आरोग्यमंत्री

Winter session - Balasaheb Thackeray Road accident insurance scheme will be launched

        हिवाळी अधिवेशन  (विधानसभा कामकाज) नागपूर, दि. 26 : रस्ते अपघात झालेल्या व्यक्तीस तत्पर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना लवकरच सुरू करणार असल्याची घोषणा सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानपरिषदेत केली.

    सदस्य मनिषा कायंदे यांनी या योजनेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री डॉ. सावंत बोलत होते.

    आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत म्हणाले, स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेला २०२० मध्ये मान्यता देण्यात आली होती. या योजनेत काही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. या योजनेंतर्गत प्रति रूग्ण प्रति अपघात उपचाराचा खर्च रूपये ३० हजारांवरुन एक लाख रुपये करण्यात आला आहे. रस्ते अपघातानंतर उपचाराच्या कालावधीत आपत्कालीन ७२ तासांची अट रद्द करण्यात आली आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेंतर्गत उपचारांची संख्या ७४ वरुन १८४ करण्यात येईल. या योजनेचा सुधारित प्रस्ताव तयार झाला असून येत्या पंधरा दिवसात मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन योजना सुरू करू, असे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी आश्वस्त केले.

    १०८ क्रमांकावरील रुग्णवाहिकेच्या सेवा व सुविधाबाबत सदस्यांनी उपप्रश्न उपस्थित केले. त्याबाबत मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, रुग्णवाहिकांचा प्रश्न गंभीर आहे. राज्यातील  सर्व विभागातील रुग्णवाहिकांची माहिती घेण्याची कार्यवाही सुरू आहे. रुग्णवाहिकांचे फॉरेन्सिक ऑडिट (न्यायवैद्यक लेखापरीक्षण) करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. तसेच राज्यात नवीन महामार्ग होत आहेत, या महामार्गांवर प्रति १०० किमी अंतरावर रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे, असेही डॉ. सावंत यांनी उपप्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

    या प्रश्नोत्तराच्या चर्चेत सदस्य सर्वश्री अनिल परब, प्रवीण दरेकर, अमोल मिटकरी, प्रसाद लाड, सुनिल शिंदे यांनी सहभाग घेऊन उपप्रश्न उपस्थित केले.

No comments