आशिर्वाद - प्रोत्साहन - मार्गदर्शन आणि चाहत्यांच्या प्रेरणेमुळे विश्वविजेते पद लाभले - देविका घोरपडे
विश्व विजेती सुवर्ण कन्या कु. देविका घोरपडेचा नागरी सत्कार करताना शुक्रवार तालीम मंडळाचे अध्यक्ष फिरोज आतार, प्रीतम तथा आबा बेंद्रे व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते. |
Blessings - encouragement - guidance and inspiration from fans led to world champion title - Devika Ghorpade
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - जागतिक स्तरावर विजयश्री मिळविताना मेहनत तर घ्यावी लागतेच पण त्यामागे आजी - आजोबांचे आशिर्वाद, आई - वडिलांचे प्रोत्साहन, प्रशिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि तुम्हा चाहत्यांची प्रेरणा असल्यानेच आपल्याला हे यश मिळविता आल्याचे भाववश उदगार बॉक्सिंग मधील विश्वविजेती सुवर्णकन्या कु. देविका घोरपडे या अवघ्या १७ वर्षांच्या बालिकेने येथील नागरी सत्कार सोहळ्यात व्यक्त करीत फलटण करांचे ऋण व्यक्त केले.
विश्वविजेती सुवर्ण कन्या कु. देविका घोरपडे स्पेन मधील जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत इंग्लंडच्या खेळाडूचा ५ : ० ने पराभव करुन विश्वविजेते पद आणि सुवर्ण पदक घेऊन रविवारी थेट फलटण येथे दाखल झाली, त्यावेळी शुक्रवार तालीम मंडळाच्या पुढाकाराने शहरातील तरुण मंडळे, गणेशोत्सव मंडळे, क्रीडा मंडळे, सार्वजनिक व सांस्कृतिक क्षेत्रातील संस्था, संघटना आणि शहरातील क्रीडा प्रेमी नागरिकांनी क्रांतिसिंह नाना पाटील चौकात कु. देविकाचे उत्स्फूर्त स्वागत केले, तेथून सजविलेल्या उघड्या जीप मधून तिची शहरातील प्रमुख मार्गावरुन मिरवणूक काढण्यात आली. चौका चौकात तिचे विविध मंडळे व शहरवासीयांनी उत्स्फूर्त स्वागत केले. शंकर मार्केट येथे खास उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर कु. देविकाचा नागरी सत्कार करण्यात आला.
आपले पुण्यातील कोच मनोज पिंगळे आणि औरंगाबाद येथील कोच सनी गेहलोत यांनी उत्तम प्रशिक्षणाद्वारे आपली उत्तम तयारी करुन घेतली असून वडील सत्यजित घोरपडे यांनी प्रशिक्षण, साधने, सुविधा यासाठी मोठा खर्च येत असूनही कधी तडजोड न करता उत्तम तेच आपल्याला उपलब्ध करुन दिले असल्याने आपण येथ पर्यंत पोहोचलो, आता पॅरिस ऑलिंपिक हेच उद्दिष्ट असून सन २०२४ च्या ऑलिंपिक मध्ये सुवर्ण पदक मिळविणारच असा निर्धार व्यक्त करीत त्यानंतर आपल्याला मोठ्या गटात खेळावे लागणार असले तरी तेथे ही विजयश्री कायम ठेवून सन २०२८ आणि २०३२ मधील ऑलिंपिक मधील सुवर्ण पदक हसील करण्याचा निर्धारही कु.देविका घोरपडे या सुवर्ण कन्येने व्यक्त केला.
शहर पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस उप निरीक्षक दिपाली गायकवाड व त्यांच्या सहकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कु. देविका घोरपडेचा यथोचित सन्मान केला, शुक्रवार तालीम मंडळाच्यावतीने अध्यक्ष फिरोज आतार व त्यांच्या सहकाऱ्यासह शहरातील अन्य संस्था, संघटनांनी यथोचित सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
प्रशिक्षक मनोज पिंगळे, सनी गेहलोत, सत्यजित घोरपडे यांची भाषणे झाली, निवृत्त क्रीडा शिक्षक प्रा. अजितराव कदम यांनी सूत्र संचालन, समारोप व आभार प्रदर्शन केले.
No comments