कोळकी येथे घरफोडी ; १ लाख ८४ हजार रुपयांचा ऐवज लंपास
फलटण(गंधवार्ता वृत्तसेवा) दि.४ - कोळकी ता. फलटण येथे भरवस्तीत असणाऱ्या फ्लॅटचे कुलूप कटावणीने तोडून, घरात प्रवेश करून, सोन्या - चांदीचे दागिणे व रोख रक्कम असे एकूण १ लाख ८४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, योगेश पोपट गाढवे हे दि. ३० नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास अनंत मंगल कार्यालयाच्या पाठीमागे कोळकी ता. फलटण येथे असणाऱ्या आपल्या गुलमोहर हॅबिटेक येथील फ्लॅटला कुलूप लावून बारामती येथे सहपरिवार गेले व त्याच दिवशी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास योगेश गाढवे कोळकी येथील घरी परत आले असता, त्यांना फ्लॅटचे कुलूप पायरीवर ठेवलेले दिसले व दरवाजास कडी लावलेली होती. योगेश गाढवे यांनी आपल्या मित्राला बोलवून आत प्रवेश केला असता बेडरुममधील कपाट व लॉकर उघडे असून त्यातील साहीत्य अस्थाव्यस्त पडलेले दिसले.
अज्ञात व्यक्तीने योगेश गाढवे यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप कटावणीने तोडून, कोयंडा मोडून, आत प्रवेश करून, १) ६० हजार रुपये किंमतीचे सुमारे साडे तीन तोळे वजनाचे सोन्याचे नेकलेस २) २५ हजार रुपये किंमतीचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण ३) १५ हजार रुपये किंमतीचे १० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठया प्रत्येकी ५ ग्रॅम वजन ४) ४० हजार रुपये किंमतीचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन मिनीगंठण ५) ८ हजार रुपये किंमतीचे २ ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले ६) २ हजार रुपये किंमतीचे टायटन कंपणीचे घडयाळ ७) ३ हजार रुपये किंमतीचे एक चांदीचे पैजण जोड व ४ जोडवी ८) ३१ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १ लाख ८४ हजार रुपयांचा ऐवज कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेला आसल्याची फिर्याद योगेश पोपट गाढवे यांनी दिली आहे.
No comments