Breaking News

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केली समृद्धी महामार्गाची पाहणी; उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः चालविले वाहन

Chief Minister and Deputy Chief Minister inspected Samriddhi Highway; Deputy Chief Minister himself drove the vehicle

    नागपूर दि.4 (जिमाका) :  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिला टप्प्यातील ५२० किलोमीटरच्या पूर्ण झालेल्या कामांची व सुविधांची आज पाहणी केली.   

    नागपूर येथून समृद्धी महामार्गास प्रारंभ होत असून तेथून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी पाहणी दौरा सुरु केला. वर्धा जिल्ह्यात समृद्धीचा 55 किलोमीटरचा मार्ग आहे. या संपूर्ण मार्गात प्रवास करत मार्गाची पाहणी करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः वाहन चालविले. अमरावती जिल्ह्यात समृद्धी महामार्गाची लांबी 73 किलोमीटर आहे. या संपूर्ण मार्गात प्रवास करत मार्गाची पाहणी करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः वाहन चालविले.

    वर्धा जिल्ह्यात महामार्गावर दोन टोल प्लाझा देण्यात आले आहेत. यापैकी विरुळ येथे टोल प्लाझा व परिसराची त्यांनी पाहणी केली. येथे आगमण झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार तसेच समृद्धी महामार्गाचे अधिकारी उपस्थित होते.

    वर्धा जिल्ह्यात सेलू, वर्धा व आर्वी या तालुक्यातून महामार्ग जात आहे. एकूण लांबी 55 किमी आहे. महामार्गाची रुंदी 120 मीटर असून सदर मार्ग 6 पदरी आहे. मार्गावर 5 मोठे व 27 लहान अशा 32 पुलांचा समावेश आहे. महामार्गावरील वाहतूक विना अडथळा होण्यासाठी 9 ठिकाणी उड्डान पूल उभारण्यात आले आहेत. येळाकेळी व विरुळ येथे इंटरचेंजेस देण्यात आले आहे. वन्यप्राण्यांचा संचार असलेल्या भागात दोन ठिकाणी उन्नत मार्ग आहे. महामार्गासाठी 782 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे तर 2 हजार 762 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

    नागपूर येथील समृद्धी महामार्गाचा झिरो पॉईंट येथून सुरू झालेला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा हा पाहणी दौरा सायंकाळी ५ वाजता शिर्डी येथे पोहोचला. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची लांबी ७०१ किलोमीटर आहे. काम पूर्ण झालेल्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याची लांबी ५२० किलोमीटर आहे.  समृद्धी महामार्गाची अहमदनगर जिल्ह्यातील लांबी २९.४० किलोमीटर आहे. यासाठी कोपरगाव तालुक्यातील १० गावांची जमीन संपादित करण्यात आली आहे. कोपरगांव इंटरचेंज पासून शिर्डीचे अंतर १० किलोमीटर आहे.

No comments