Breaking News

दुसऱ्या दिवशीही फलटण शहरातील अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा

Encroachment removal campaign in Phaltan city

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३० डिसेंबर - फलटण नगर परिषदेच्या वतीने आज दुसऱ्या दिवशीही शहरांमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम चालू ठेवण्यात आली असून, शहरात रस्त्याच्या कडेला असणारी व वाहतुकीस अडथळा ठरणारे पत्र्याची शेड्स, कट्टे, वेदर शेड्स, वाढीव बांधकाम अशी अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने रविवार पेठ, मेटकरी गल्ली,  उमाजी नाईक चौक परिसर या ठिकाणची अतिक्रमणे काढण्यात आली. दरम्यान तोंडे पाहून अतिक्रमणे काढू नयेत, काढली तर सर्वांचीच अतिक्रमणे काढावीत अश्या भावना नागरिकांनी यावेळी व्यक्त केल्या. 

    फलटण नगरपरिषद हद्दीतील आरक्षित जागा, पडीक जागा, गायरान जमीनी, शासकीय जमीनी, नगरपरिषद मालकीच्या जागेवर, रस्त्यावरील अतिक्रमणे यांचेवर कार्यवाही करणेकामी मा. उच्च न्यायालय आणि शासनाने आदेश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने फलटण नगरपरिषद व तहसिल कार्यालय यांचे संयुक्त अतिक्रमण हटाओ मोहिम दिनांक २९/१२/२०२२ पासून सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेत रस्त्यावरील व वाहतुकीस अडथळा निर्माण होणारी अतिक्रमणे, जाहिरात फलक, शासकीय जमीनीवरील अतिक्रमणे काढणेत आली आहेत. शहरातील बहुतांश नागरीकांनी अतिक्रमणे, जाहिरात फलक, पत्राशेड स्वतः हटवुन नगरपरिषदेस सहकार्य केले. यापुढे नागरीकांनी अशाच प्रकारे स्वतः अतिक्रमणे काढुन घेणेत यावी असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले. 

    या मोहिमेमध्ये  फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, पंढरीनाथ साठे, नगरअभियंता फलटण नगरपरिषद,  रोहीत पाटील,  विनोद जाधव,  सुरेंद्र काळेबेरे तसेच सर्व विभाग प्रमुख व अधिनिस्त कर्मचारी नगरपरिषद यांनी मोहिमेत सहभाग घेतला.  

No comments