Breaking News

फलटण तालुक्यात श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची सत्ता अबाधीत

विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा देताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

In the Gram Panchayat elections, NCP came to power in Phaltan taluka under the leadership of  Shrimant  Ramraje Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २० : आगामी जिल्हा परिषद/पंचायत समिती पंचवार्षिक निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यात पार पडलेल्या २४ ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकांमध्ये बाजी मारत, श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्वाखाली,  फलटण तालुक्यावर आपले वर्चस्व कायम असल्याचे राजे गटाने (राष्ट्रवादी काँग्रेस) निदर्शनास आणून दिले आहे. २४ पैकी २० ग्रामपंचायती आपल्याकडे आल्याचा दावा राजे गटाने केला आहे. 

        राजे गटाने (राष्ट्रवादी काँग्रेस) २०, भाजपाकडे ३ आणि युवा नेते सह्याद्री कदम यांनी गिरवीचा गड राखत आपली सत्ता कायम ठेवली आहे. दरम्यान भाजपच्या वतीने मात्र ६ ग्रामपंचायती आपल्याकडे आल्याचा दावा केला आहे.

   सुरवडी ग्रामपंचायती मधील गेल्या २५/३० वर्षांची सत्ता अबाधीत ठेवत प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीतही सर्वसामान्य जनता आपल्या बरोबर असल्याचा दावा करीत कितीही कठीण परिस्थिती असली तरी लोक आपल्याला सोडून जाणार नाहीत असा विश्वास व्यक्त करीत मतदारांचे आभार मानले आहेत.

        दरम्यान बहुचर्चित विडणी ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदी भाजपाचे सागर अभंग यांनी एकतर्फी विजय मिळवीत श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्या गटाचे (राजे गट) सरपंच पदाचे उमेदवार सुरेश नाळे यांचा दारुण पराभव केला आहे, मात्र सदस्य निवडीत राजे गटाने बहुमत राखले आहे.

       राजेगटातून थेट सरपंच पदावर आरुढ झालेले गाव कारभारी खालील प्रमाणे -  वडले - संतोष दिनकर लाळगे, दुधेबावी - सौ. भावना माणिकराव सोनवलकर, मठाचीवाडी - जयश्री निलेश भोसले, बरड - प्रकाश शामराव लंगुटे, आदर्की बुद्रुक - गणपतराव संपतराव धुमाळ, आदर्की खुर्द -  निलम सौरभ निंबाळकर, सालपे - दादासाहेब सदाशिव कोळपे, पाडेगाव -  राहुल बाळासाहेब कोकरे, चव्हाणवाडी - चंद्रभागा भालचंद्र गोरे, कुसुर - रेश्मा संदिपकुमार नरुटे, सोमंथळी - किरण हनुमंत सोडमिसे, पिंप्रद - स्वाती गणेश भगत, चौधरवाडी - तुकाराम नामदेव कोकाटे, वाठार निंबाळकर - सौ. सुवर्णा नंदकुमार नाळे, कुरवली खुर्द - राहुल बापूराव तोडकर, ताथवडा - दशरथ आबासाहेब शिंदे, तरडफ - रंजना संपत गोडसे. 

    भाजपा मधून थेट सरपंच पदावर आरुढ झालेले खासदार गटाचे गाव कारभारी खालील प्रमाणे - सुरवडी सौ. शरयु जितेंद्र साळुंखे पाटील, विडणी - सागर कांतीलाल अभंग. 

         यापूर्वी झडकबाईचीवाडी, वेळोशी, मिरेवाडी (कु), मानेवाडी या ४ ग्रामपंचायत निवडणूका  बिनविरोध पार पडल्या आहेत. त्यामध्ये दोन्ही बाजूने २/२ चा दावा केला जात आहे.

       गिरवी येथे सह्याद्री चिमणराव कदम यांच्या गटाच्या वैशाली राजेंद्र कदम सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. सदस्य पदावरही त्यांनी बहुमत मिळविले आहे.

        तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून समीर मोहन यादव यांनी उत्तम काम केले. त्यांना प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांचे मार्गदर्शन लाभले तर अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उत्तम सहकार्य केले.

   उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक दादासाहेब पवार आणि ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे व त्यांच्या सहकाऱ्यानी आणि गृह रक्षक दलाचे जवानांनीही चोख पोलिस बंदोबस्त ठेवल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.

No comments