Breaking News

चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ फलटण येथे मोर्चा ; मोर्चेकऱ्यांनी दिली 'भीक'

March in protest of Chandrakant Patil at Phaltan

    फलटण(गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० डिसेंबर- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यसह फलटणमध्येही उमटले असून, दि. १० डिसेंबर रोजी संविधान समर्थन मोर्चाच्या वतीने मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध व्यक्त करत मोर्चा काढून, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कायदा करावा अशी मागणी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे करण्यात आली. यावेळी मोर्चेकऱ्यांनी आपल्या खिशातून पैसे, नाणी गोळा करून ती 'भीक' प्रशासनाने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पर्यंत पोहचवावी अशी मागणी केली.

उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्याकडे निवेदन देताना मोर्चेकरी

    संविधान समर्थन मोर्चाच्या वतीने काढण्यात आलेला मोर्चा मंगळवार पेठ, फलटण येथून सुरू होऊन, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, प्रांत कार्यालयाबाहेर आल्यानंतर, मोर्चेकऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप  यांनी मोर्चेकऱ्यांशी चर्चा केली व निवेदन स्वीकारले. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे उपस्थित होते.

    संविधान समर्थन मोर्चाच्या वतीने काढण्यात आलेला मोर्चा हा कोणत्याही पक्षाच्या, सरकारच्या विरोधात नव्हता, तर महापुरुषांचा अवमान करणाऱ्या प्रवृत्ती व विचारधारेचा निषेध करण्यासाठी काढण्यात आला असल्याचे संविधान समर्थन मोर्चाच्या वतीने जाहीर करून, चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेल्या ‘बेताल’ वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली तसेच चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व महापुरुषांचा अवमान करणाऱ्या विरोधात कायदा करावा अशी मागणी  करण्यात आली. 

     मोर्चेकऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करून, मंत्री चंद्रकांत पाटील यांना फलटणमध्ये आल्यानंतर ‘काळे’ फासण्यात येईल असा इशारा दिला. तर काही मोर्चेकऱ्यांनी निषेध व्यक्त करताना, निवडणुकीच्या काळात याच महापुरुषांचे फोटो स्टेजवर लावून तुम्ही आमच्याकडे मतांची भीक मागायला येता, त्यामुळे  चंद्रकांत पाटील व इतरांनी महापुरुषांबद्दल बोलताना विचार करून बोलणे गरजेचे असल्याचे सांगितले.

No comments