Breaking News

आ. जयकुमार गोरे यांच्या गाडीचा भीषण अपघात : प्रकृती स्थिर

गाडी क्रेनद्वारे नदी पात्रातून बाहेर काढण्यात आली
MLA Jeyakumar Gore's car accident: Condition stable

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  दि. २४ : आळंदी - पंढरपूर पालखी महामार्गावर फलटण शहराच्या प्रवेशद्वारावर बाणगंगा नदीवरील पुलाचे संरक्षक ग्रील तोडून ५० फूट खोल नदी पात्रात भाजप सातारा जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांची गाडी पडल्याने झालेल्या भीषण अपघातात आ. गोरे यांच्यासह ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. आ. गोरे यांना अधिक वैद्यकिय उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

     नागपूर हिवाळी अधिवेशनातून  विमानाने पुण्यात आणि तेथून  गाडीने आपल्या गावाकडे निघालेल्या आ. जयकुमार गोरे यांच्या समवेत त्यांचे स्वीय सहाय्यक साळुंखे, अंगरक्षक बनसोडे, वाहन चालक दडस हे होते. शनिवारी पहाटे पहाटे ३.१५ वाजण्याच्या सुमारास शहरातील बाणगंगा नदीवरील पुलाच्या सुरुवातीची ग्रील तोडून गाडी थेट बाणगंगा नदी पात्रात ५० फूट खोल खाली पडल्याने भीषण अपघात झाला आहे. 

अपघातानंतर गाडीची झालेली अवस्था

       सदर अपघाताबाबत जखमी अवस्थेतही प्रसंगावधान राखून स्वतः आ. जयकुमार गोरे यांनी याबाबतची माहिती मोबाईलद्वारे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिली. अपघाताची माहिती समजताच खा. नाईक निंबाळकर यांनी तातडीने सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत, रुग्णवाहिका, पोलिस यांना अपघाताची माहिती दिली. 

       खोलवर नदीपात्र व अंधार यामुळे अपघात नेमका कोठे झाला हे लक्षात येत नव्हते, मात्र आ. गोरे यांच्यासोबत गाडीत असलेले त्यांचे अंगरक्षक बनसोडे जखमी अवस्थेतही वर येऊन मदत करण्याची विनंती करीत असल्याने अपघात नेमका कोठे झाला व अपघात ग्रस्त वाहन कोठे आहे हे लक्षात आले.

     या अपघाताची माहिती मिळताच उप विभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे व अन्य पोलिस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गाडीत जखमी अवस्थेत असलेले आ. जयकुमार गोरे, त्यांचे स्वीय सहाय्यक रुपेश साळुंखे, चालक कैलास दडस यांना बाहेर काढून त्यांच्या सह अंगरक्षक बनसोडे यांना तातडीने येथील निकोप हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. हॉस्पिटलचे डॉ. जे. टी. पोळ, डॉ. सौ. सुनिता पोळ,  डॉ. हेमंत मगर, डॉ. तेजस भगत, डॉ. प्रवीण आगवणे व हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी तातडीने सर्व जखमींवर उपचार केले. प्राथमिक उपचारानंतर खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आ. गोरे यांना अधिक उपचारांसाठी पुणे येथील खाजगी रुग्णालयात खास रुग्णवाहिकेतून रवाना केले, स्वतः त्यांच्या सोबत पुण्यास गेले.

       स्वीय सहाय्यक रुपेश साळुंखे, चालक कैलास दडस यांना बारामती येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते परंतू स्वीय सहाय्यक रुपेश साळुंखे यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांनाही पुणे येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अंगरक्षक पोलिस कर्मचारी जनार्दन बनसोडे यांचेवर निकोप हॉस्पिटल, फलटण येथे आणि वाहन चालक दडस यांच्यावर बारामती येथे उपचार सुरु आहेत.

       अपघात स्थळी व रुग्णालयात पोलिस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधिक्षक बापू बांगर यांनी प्रत्यक्ष भेट देवून तेथील परीस्थितीची पाहणी करुन पोलिस अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुचना केल्या आहेत.

        दरम्यान आपघातातील गाडी क्रेनद्वारे नदी पात्रातून बाहेर काढण्यात आली त्यावेळी गाडीतील एअर बँग उघडल्या नसल्याचे दिसून आले, अपघाताचे निश्चित कारण समजू शकले नाही, सीट बेल्ट न लावल्याने एअर बँग उघडल्या नाहीत अशा विविध प्रतिक्रिया आपघातस्थळी व्यक्त होत होत्या. 

     आ. गोरे यांच्या गाडीस अपघात झाल्याची चर्चा सोशल मिडीयाद्वारे तालुक्यासह सर्वत्र वेगाने पसरल्याने अनेकजण फोनद्वारे आपघाताची माहिती घेत असल्याचे दिसत होते. 

No comments