Breaking News

बहुआयामी : शरद पवार

Multifaceted leadership: Sharad Pawar

    भारतीय राजकारणातील जेष्ठ नेते आदरणीय शरद पवार आज वयाची ८२ वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांनी केलेल्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार, कृषी आणि क्रीडाविषयक कार्याचे, सिंहावलोकन करण्याचा एक प्रयत्न प्रस्तुत लेखातून केला आहे.

    समग्र भारताच्या राजकारणाची नस आणि कुस ज्यांना चांगली ज्ञात आहे, ते शरद पवार भारतीय राजकारणातील एक शालीन आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व आहे. वर्तमान राजकारणात अशा सर्वांगसंपन्न व्यक्तिमत्त्वाची प्रचंड उणीव दिसते आहे. आज भारतीय राजकारणातून नम्रता, सहिष्णुता, शालीनता, उदारता, धर्मनिरपेक्षता आणि सुसंस्कृतता ही मूल्ये जवळपास हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत. राजकारणातील ही गढूळता, बीभत्सता शुद्ध करायची असेल, तर शरद पवार यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या इत्थंभूत भूमिकेचा नव्या पिढीने अभ्यास केला पाहिजे. कारण शरद पवार हे भारताला लाभलेले एक बहुआयामी असं नेतृत्त्व आहे.

    १२ डिसेंबर १९४० रोजी शरद पवार यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. त्यांचे बालपण बारामती परिसरातल्या काटेवाडी या गावात गेले. बालपणापासूनच ते धाडसी, हट्टी, अन् खोडकर होते. सर्व जातिधर्माच्या मुलांसोबत ते मनसोक्त खेळायचे. परिणामाची पर्वा न करता, पटेल ते, वाटेल ते करण्यात, ते मागेपुढे पाहत नसत. गोठ्यातील जनावरांना चापटा मारणं, गाढवाच्या शेपटीला डबा बांधून त्याला पळवणं, कुत्र्याला दगडं मारणं, घरी आलेल्या पाहुण्यांची सायकल पळवणं, असे उद्योग त्यांनी बालपणात केले आहेत.

    त्यांचे वडील गोविंदराव आणि आई शारदाबाई हे दोघेही सुधारणावादी आणि पुरोगामी विचारसरणीचे होते. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारसरणीचा प्रभाव त्यांच्यावर होता. त्यामुळे शरद पवार यांच्यावरही तसेच संस्कार झाले. त्यांच्या घरातल्या पुरोगामी वातावरणामुळे, त्यांच्या घरी, महार, मांग, चांभार, धनगर, वडार, साळी, कोळी, माळी अन् भटके अशा सर्व जातीधर्मातील मुले त्यांच्या घरी येत जात असत. बालपणी सगळ्यात मिळून मिसळून राहण्याचा त्यांचा हा गुण, त्यांना आतापर्यंतच्या आयुष्यात मोठे यश आणि मोठेपणा देऊन गेला आहे.

    शरद पवार १९६२ साली बी.कॉम. झाले. पुण्याच्या बृहनमहाराष्ट्र कॉलेजमधील त्यांचे शैक्षणिक जीवन विविध अर्थाने मोलाचे ठरले. बृहनमहाराष्ट्र कॉलेजमध्ये यशवंतराव चव्हाण एकदा प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यावेळी शरद पवार यांनी स्वागतपर भाषण केले होते. ते भाषण यशवंतरावांना खूप आवडले. त्या कार्यक्रमानंतर काही दिवसांनी शरद पवार युवक कॉंग्रेसचे पूर्णवेळ सभासद झाले. त्या काळात चीनने भारतावर नुकतंच आक्रमण केले होते. हिंदी चिनी भाई भाई या सदभावनेला चीनने हारताळ फासला होता. अशा पार्श्वभूमीवर शरद पवार युवक कॉंग्रेसमध्ये दाखल झाले.

    १९६६ साली त्यांना युनेस्कोची फेलोशिप मिळाली. या फेलोशिपचा त्यांना खूप फायदा झाला. ब्रिटन, फ्रान्स, नार्वे, जर्मन, अमेरिका, डेन्मार्क, कॅनडा, स्वीडन व जपान या देशांनी भरवलेल्या आंतरराष्ट्रीय युवक परिषदेला ते हजर राहिले. त्यामुळे त्यांना विदेशातल्या राजकारणाचे स्वरूप, तिथली राजकीय संस्कृती, समाजव्यवस्था आणि राजव्यवस्था यांच्यातील सहसंबंध आणि संघटना बांधणीचे कौशल्य समजून घेता आले. भारतीय राजकारणात प्रचंड खोली आणि उंची लाभलेलं हे नेतृत्व कसं विकसित आणि आकारत गेलं,याची ही पार्श्वभूमी आहे.

    १९६२ ते १९६७ या काळात काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. महाराष्ट्रातील युवक कार्यकर्त्याची शिबिरे, मेळावे आयोजित करून, त्यांनी कॉंग्रेस पक्षाचे संघटन मजबूत केलं. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील या त्रिकुटाच्या पाठिंब्याने अन् प्रोत्साहनपर मार्गदर्शनामुळे ते अधिक गतिमान झाले. या त्रिकुटाचे मार्गदर्शन, पाठिंबा त्यांना लाभला नसता तर कदाचित वेगळे शरद पवार आपल्याला दिसले असते.

    शरद पवार यांनी युवक कॉग्रेसची संघटना बांधण्यासाठी जे कष्ट घेतले, त्याचे फळ त्यांना १९६७ मध्ये मिळाले. १९६७ च्या महाराष्ट्र विधानसभेसाठी त्यांना बारामतीतून कॉंग्रेसने उमेदवारी दिली. त्या पहिल्या निवडणुकीत ते मोठ्या फरकाने विजयी झाले. त्यावेळी त्यांचे वय अवघं २६ वर्षाचं होतं. त्याकाळी महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात तरूण आमदार अशी त्यांची ओळख होती. आज वर्तमानात अनेक आमदारांची मुले कमी वयात आमदार झाली आहेत. परंतु त्यांना त्याच्या बापजाद्यांचा वारसा आहे. शरद पवार यांनी त्या काळात मिळवलेलं यश, हे शुद्ध कष्टाने मिळवलेलं होतं. हे दुर्लक्षित करता येणार नाही.

    शरद पवार आमदार झाल्यानंतर, लग्नासाठी अनेक स्थळे येऊ लागली. परंतु पवार कुटुंबियांना हुंडा, मानपान, बडेजाव असल्यात अजिबात रस नव्हता. फक्त मुलाला मुलगी अनुरूप, साजेशी आणि पुरोगामी विचारसरणीची असावी, अशी साधी अपेक्षा होती. ही अपेक्षा पुण्यातील नावाजलेले किक्रेटपटू सदाशिव उर्फ सदू शिंदे यांची थोरली मुलगी प्रतिभा, हिच्या रूपाने पूर्ण झाली. परंतु लग्नापूर्वीच्या एका भेटीत त्यांनी आपल्या भावी पत्नीला, आपल्या अपेक्षा बोलून दाखवल्या होत्या. त्यातील एक अपेक्षा अशी होती की, एका अपत्यानंतर कुटुंबनियंत्रण करायचं. प्रतिभाताईंनी ही अपेक्षा पटकन मान्य केली. त्यानंतर मग १९६७ साली शरद पवार लग्नबंधनात अडकले. दोन वर्षांनी, १९६९ साली त्यांना कन्यारत्न झाले आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी कुटुंबनियंत्रण केले. शरद पवार यांचा त्या काळातला निर्णय धाडसी, आदर्श आणि लोकसंख्या नियंत्रणाला बळ आणि ऊर्जा देणारा होता.

    बोले तैसा चाले । त्याची वंदावी पाऊले या तुकारामाच्या उक्तीप्रमाणे आजही शरद पवार आपल्या आयुष्याची वाटचाल मोठ्या निष्ठेने आणि श्रध्देने करत आहेत. राजकारणी कुठल्याही काळातला असो, त्यांचे वर्तन आणि व्यवहार आदर्शवत असले पाहिजेत. शरद पवार यांचे सगळेच वर्तन व्यवहार प्रगल्भ जाणिवेचे अधिष्ठान असलेले असतात. राजकारणात येणाऱ्या नव्या पिढीने या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत.

    महात्मा गांधीजी म्हणायचे, काम हेच शिक्षण आहे. गांधीजींच्या संकल्पनेतलं हे शिक्षण शरद पवार यांनी प्रचंड मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने मिळवले. आज भारतीय राजकारणाच्या परिक्षेत्रात  त्यांच्या नावाचे जे वलय आहे, ते भारतीय राजकारणासाठी दिशादर्शक, मार्गदर्शक आहे. १९६७ ते २०२२ या सहा दशकातलं त्यांचे राजकारण, समाजकारण, अर्थकारण, साहित्य, संगीत, कला, कृषी, सहकार आणि क्रीडा क्षेत्रातील त्यांचे योगदान भव्य आणि दिव्य सवरूपाचे राहिलेले आहे.

    १९७८ साली शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोदचे( पुरोगामी लोकशाही दल ) सरकार स्थापन झाले. या पुलोद सरकारमध्ये अनेक पक्ष सहभागी झाले होते. पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर , त्यांनी पहिली घोषणा केली की, माझे सरकार हे शेतकऱ्यांच्या तोंडवळ्याचं असेल. यातून त्यांचे शेतकर्यााबद्दलचे प्रेम दिसून येते. मुख्यमंत्रीपदाची त्यांची पहिली कारकीर्द अनेक अर्थांनी लोकांच्या लक्षात राहिली. त्या काळात त्यांनी अनेक धाडसी, जनहिताचे आणि समाज परिवर्तनाला दिशा देणारे निर्णय घेतले. त्यामध्ये मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा ठराव, त्यांनी आपल्या कारकीर्दित मंजुर करून घेतला. अनेकांचा विरोध पत्करून त्यांनी हा निर्णय घेतला. सरकार जाईल की राहील यांची चिंता त्यांनी बाळगली नाही.

    पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात आणि नंतरही, ते प्रचंड काम करायचे. टेबलावर एकही फाईल ते प्रलंबित ठेवत नसत. सर्व फाईली वाचणारा मुख्यमंत्री अशी त्यांची प्रतिमा त्याकाळात होती. ते सर्व फाईली काळजीपूर्वक वाचत असत व स्वतःच्या हाताने आदेश लिहित असत. त्यामुळे निर्णयप्रक्रिया गतिमान होत असे. पुलोदच्या काळात ते महाराष्ट्रभर फिरत असत. सर्वात जास्त फिरणारा मुख्यमंत्री अशी नोंद केवळ त्यांच्याच नावावर आहे. त्यांचे रेकॉर्ड अजून कोणी मोडलेले नाही.

    १९८८ साली ते दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाले. त्या काळात त्यांनी मंडल आयोगाच्या पार्श्र्वभूमीवर भटक्या विमुक्तांना आरक्षण दिलं. ज्यांचे बोट धरून ते राजकारणात आले, त्या यशवंतराव चव्हाणांच्या नावाने त्यांनी महाराष्ट्रात मुक्त विद्यापीठाची स्थापना केली. तर १९९३ साली चौथ्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर, त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाची तरतूद केली. मात्र त्या काळात त्यांना काही गंभीर संकटालाही सामोरे जावे लागले. १९९३चा मुंबई बॉम्बस्फोट आणि सप्टेंबर १९९३ चा लातूर भुकंप या दोन्ही संकटांत त्यांच्या नेतृत्वाचा कस लागला होता. मात्र या संकटाच्या काळात त्यांनी केलेले नियोजन आणि व्यवस्थापन अनेकांना अवाक करणारे होते. नम्र स्वभाव आणि उत्तम संघटन कौशल्याच्या जोरावर त्यांनी अनेक संकटे हाताळली व त्यावर मातही केली आहे.

    शेती हा त्यांचा आवडता प्रांत आहे. राज्यात मुख्यमंत्री आणि केंद्रात कृषीमंत्री असताना, त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. त्यांनी ऊसावर प्रक्रिया करणारे साखर कारखाने, कापसावर प्रक्रिया करणाऱ्या सूतगिरण्या, दुधावर प्रक्रिया करणारे दूधसंघ, आणि शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या सहकारी सोसायट्या अधिक मजबूत केल्या. सर्व उद्योगांना आवश्यक असणारे अर्थसाहाय्य, कर्जपुरवठा करण्यात त्यांनी मोलाची भूमिका पार पाडली. त्यांच्या कामगिरीमुळे ग्रामीण महाराष्ट्राचे चित्र बदल्ण्यास निश्चितपणे मदत झाली. युपीए सरकारच्या काळात ते कृषीमंत्री असताना, त्यांनी शेतकऱ्यांचे ७२ हजार कोटीचे कर्ज माफ केले. आजही ग्रामीण माणूस आणि शरद पवार यांची नाळ अतुट आहे. ' करून दाखवणारा नेता' अशी त्यांची ओळख संबंध भारतात आहे.

    शरद पवार यांचे वाचनप्रेम, साहित्यप्रेम अप्रतिम आहे. आजही ते सगळी वर्तमानपत्रे, सकाळी लवकर उठून वाचत असतात. साहित्य क्षेत्रातल्या जुन्या-नव्या अनेक मंडळीशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. वि.वा.शिरवाडकर, पु.ल.देशपांडे, प्र.के.अत्रे, ग.दि.माडगूळकर, रा.रं.बोराडे, आनंद यादव, रामदास फुटाणे, फ.मुं शिदे, विठ्ठल वाघ आणि ना.धों.महानोर अशा अनेकांशी त्यांचे सख्य आहे. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानात गदिमांच्या आठवणी जपण्यासाठी, त्यांनी गदिमांच्या नावाने सभागृह बांधले.

    शरद पवार यांचे कुस्ती, कबड्डी आणि किक्रेटप्रेम दुर्लक्षित करता येणार नाही. महाराष्ट्र कुस्ती संघ, महाराष्ट्र क्रिकेट संघटना आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांच्या अध्यक्षपदावर राहून, त्यांनी खेळांडूच्या हिताचे निर्णय घेतले. खेळात आणि शिक्षणात त्यांनी कधीच राजकारण आणले नाही. जीवनाच्या सर्व क्षेत्रातला त्यांचा वावर आणि व्यवहार कमालीचा लोकविलक्षण राहिला आहे. लोकांमध्ये राहायला, वावरायला, अन् त्यांचे प्रश्न सोडवायला ते नेहमी प्राधान्य देतात. कोरोना काळातले त्यांचे महाराष्ट्रातील दौरे खूप लक्षवेधक ठरले. त्यांचे जनतेवर जेवढे प्रेम आहे, तेवढेच प्रेम ते आपल्या कुटुंबावर, भावंडावर करतात. त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासात, त्यांच्या सहचरिणीची त्यांना लाभलेली साथ, मोठी लाखमोलाची आहे. काही मोजक्या समारंभात ते दोघेजण जोडीने दिसतात. तेव्हा त्यांचा साधेपणा उपस्थितांना भारावून आणि गहिवरून टाकतो. दिल्लीतला त्यांचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम याची उत्तम साक्ष देतो.

    १९९१ साली त्यांना पंतप्रधानपदाची संधी आली होती, पण काही वक्रदृष्टीच्या लोकांमुळे ती हुकली. त्यावेळी पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान झाले. शरद पवारांची कार्यबहुलता आणि कार्यक्षमता लक्षात घेऊन, पंतप्रधान नरसिंहराव त्यांना म्हणाले की, " काळ फार बिकट आहे, देश अत्यंत अवघड परिस्थितीतून जात आहे. देशापुढे अनेक समस्या, आव्हाने उभी आहेत. या सर्व खडतर परिस्थितीत तुम्ही मला दिल्लीत हवे आहात." खुद्द पंतप्रधानांनी अशा प्रकारचे आवाहन केल्यानंतर, त्यांनी तत्काळ मुख्यमंत्रीपद सोडले आणि केंद्रात त्यांनी संरक्षण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. शरद पवार यांचे राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण यांनीही त्याच पदावर काम केले होते.

    शरद पवार यांनी त्या पदावर असताना, सेनादलाचे मनोबल वाढवण्यावर व आधुनिकीकरणावर विशेष भर दिला. तसेच भारत-चीन यांचे बिघडलेले संबंध सुधारण्यासंबंधी विशेष प्रयत्न केले. संरक्षण विषयक सहकार्यासाठी त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या. मात्र काश्मीरमधला दहशतवाद राजकीय स्वरूपाचा असल्यामुळे त्यांना नियंत्रणात आणता आला नाही. याची सल त्यांच्या मनात कायम आहे.

    आजही भारतीय राजकारणात एखादा भुकंप झाला की, त्यांचा केंदबिंदू बारामतीत आहे, असा दाट संशय लोकांना येऊ लागतो. ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने तयार केलेली एक खासियत आहे. एक लहेजा आहे. आजही कधी माध्यमात पंतप्रधानपदाच्या नावाची चर्चा होते, तेव्हा आपसुकच त्यांचे नाव आघाडीवर असते. ' जनतेच्या मनातला पंतप्रधान ' ही त्यांची ओळख आजही जनतेच्या मनात सुखरूप आहे.

    १९९९ साली ते राष्ट्रीय काँग्रेसपासून वेगळे झाले असले, तरी काँग्रेसी विचाराची नाळ त्यांनी कधीच तुटू दिली नाही. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा स्वतंत्र राजकीय पक्ष काढला. त्या पक्षाची वेगळी ओळख महाराष्ट्रात प्रस्थापित करण्यात ते यशस्वी देखील झाले. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत, साताऱ्यातल्या एका प्रचार सभेत ते भर पावसात बोलत राहिले. त्या पाऊससभेने पुढे मोठा इतिहास रचला अन् पावसापेक्षा राजकारणाला आणि समाजकरणाला मोठं करणारा नेता अशी चर्चा जनमानसात सुरू झाली. त्या पाऊस सभेनंतर वर्तमानपत्राची पाने भरगच्च भरली आणि पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणसमीकरणाची चर्चाही सुरू झाली. २०१९ साली उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यामध्ये शरद पवार यांची भूमिका फार महत्त्वपूर्ण होती.

    रयत शिक्षण संस्था आणि पवार कुटुंबिय याचे नाते खूप वर्षाचे आणि खूप दिवसाचे आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षणकार्याच्या निमित्ताने , त्यांच्या घरी सतत जाणं येणं असे. कर्मवीरांच्या कार्याचा आवाका लक्षात आल्यानंतर, शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वाढीसाठी, विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे धोरण स्वीकारले. 

    १९७२ साली ते रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य झाले. या घटनेला आज ५० वर्ष पूर्ण होत आहेत. १९८९ पासून ते आजतागायत शरद पवार रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदावर कार्यरत आहेत. आज रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने व सोयीसुविधांनी सशक्त आणि संपन्न आहेत. यामध्ये त्यांचे योगदान खूप मोलाचे राहिलेले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रयत शिक्षण सस्थेची वाटचाल अतिशय जोमाने सुरू आहे.

    शरद पवार १५ वर्षाहून अधिक काळ सत्तेबाहेर राहिले, पण त्यांनी आपली विजिगीषूवृत्ती सोडली नाही. १६ व्या लोकसभेचा अपवाद वगळता ( राज्यसभा खासदार ) १९६७ पासून ते कायम जनतेतून निवडून आलेले आहे. अपराजित योद्धा अशी त्यांची ओळख आहे. यश अपयशाचा फारसा गाजावाजा न करता, जे वाट्याला आलं, त्याचा स्वीकार त्यांनी नम्र आणि संयतपणे केला. हा लोकनेता यशाने कधी हुरळला नाही अन् अपयशाने कधी हबकला नाही. असा स्थितप्रज्ञ राजकारणी, भारतीय राजकारणात दुर्मीळ म्हणावा लागेल.

    शरद पवार यांची सभागृहातली वागणूक, त्यांची शालीनता, सभागृहातल्या बाकावरूनच प्रतिवाद करण्याची त्यांची हुकमत आणि ज्या क्षेत्राविषयी ज्ञान नाही, अशा क्षेत्रातील मान्यवरांकडून माहिती घेण्याचे त्यांचे कौशल्य आणि सौजन्य आजही कायम आहे. याचं अप्रुप वाटतं. साधेपणा, नम्रपणा, निरांहकारी भाषाशैली आणि कमी वेळात अचूक निर्णय घेण्याची वृत्ती, त्यांच्या अंगोपांगात भिनलेली आहे. वयाच्या २४ व्या वर्षापासून त्यांचा सुरू झालेला राजकीय प्रवास आज ८२ व्या वर्षांपर्यंतही ताजा, टवटवीत आणि गोड आहे. ते चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकदा देशाचे संरक्षणमंत्री झाले. दोनदा कृषीमंत्री झाले. तर कैक संस्थांच्या अध्यक्षपदावर राहिले. या सगळ्या प्रवासात कुणाबरोबर कटुता येणार नाही, याची त्यांनी कायम खबरदारी घेतली. 

    तरीही त्यांचे विरोधक, त्यांची बदनामी करण्यासाठी नवनवीन षढयंत्र आखत असतात. परंतु शरद पवार अशा कुठल्याही षढयंत्राने ना खचले आहेत, ना दबले आहेत, ना निराश झाले आहेत. उलट अशा सगळ्या गोष्टींना गार्भीर्याने घेऊ नका, अशा प्रकारचा धीर ते आपल्या सहकारी, कार्यकर्त्यांना देत असतात. यातून त्यांची राजकारणातली प्रगल्भ जाणीव अधोरेखित होते.

    बारामतीतून त्यांचा सुरू झालेला जीवनप्रवास ' लोक माझे सांगाती ' ( २०१५ ) या त्यांच्या आत्मचरित्रातून लोकांना सतत प्रोत्साहन अन् प्रेरणा देत राहतो. त्यांचे सगळे वाढदिवस ठेवणीतले आणि आठवणीतले असतात. यंदाचा वाढदिवसही असाच अनोखा असेल. यात शंका नाही. तुम्हाला ८२ व्या वाढदिवसाच्या कृतज्ञपूर्वक हार्दिक शुभेच्छा ! राजकारणाच्या वाटेवरचा तुमचा हा प्रवास आणि तुमच्यातला बहुआयामीपणा अनेकांना प्रेरणा देत राहो ! अशी प्रार्थना !
संदर्भग्रंथ : 
अँड. राम कांडगे - लोकनेते शरदराव पवार, राजश्री प्रकाशन, चाकण, पुणे
प्रथमावृत्ती नोव्हेंबर २०१०

डॉ. आबासाहेब सरवदे
कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, वाशी नवी मुंबई

No comments