कावीळ साथ आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक उपाय योजना राबवाव्यात - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
तरडगाव येथील कावीळ साथीच्या आढावा बैठकीत सूचना करताना आ. दीपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, अतिरिक्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले व अन्य अधिकारी |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १२ : तरडगाव, ता. फलटण येथील कावीळ साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग, ग्रामपंचायत आणि सर्व संबंधीतांनी सतर्क राहुन आवश्यक उपाय योजना प्राधान्याने राबवाव्यात अशा स्पष्ट सूचना सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी संबंधीत यंत्रणेला दिल्या आहेत.
तरडगाव येथे कावीळ रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रा. आरोग्य केंद्र, तरडगाव येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. दीपकराव चव्हाण, जिल्हा परिषद अतिरिक्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कदम, सरपंच सौ. जयश्री चव्हाण, उपसरपंच प्रशांत गायकवाड आदी पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
उपचारासाठी आलेल्या कावीळ सह कोणत्याही आजाराच्या रुग्णाला तात्काळ वैद्यकिय सेवा, सुविधा द्याव्यात आणि उपचार घेत असलेल्या सर्व कावीळ रुग्णांची योग्य काळजी घ्यावी अशा स्पष्ट सूचना देतानाच श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा आढावा संबंधीतांकडून घेतला.
कावीळ साथ लहान मुलांमध्ये अधिक दिसत असल्याने शालेय विद्यार्थ्यांबाबत विशेष दक्षता घ्यावी तसेच हॉटेल, हातगाडे व मंगल कार्यालय या ठिकाणी संबंधीतांना पिण्याच्या पाण्याबाबत योग्य काळजी घेण्यास ग्रामपंचायत आणि प्रा. आरोग्य केंद्रामार्फत आवश्यक सूचना द्याव्यात, गावात आणि वाड्या सर्वेक्षण करुन कावीळ नियंत्रणासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना या बैठकीत करण्यात आल्या.
कावीळ साथीला अटकाव म्हणून आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत यांच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाय योजनांची माहिती घेण्यात आली. या दोन्ही विभागाने एकमेकात समन्वय साधत नागरिकांना आवश्यक सुविधा देत जनजागृती करण्यासाठी तत्पर रहावे. यासाठी कर्मचारी यांनी देखील कामात निष्काळजीपणा न दाखविता जागरुक राहून काम करावे अशा सूचना आ. दिपकराव चव्हाण यांनी केल्या.
No comments