Breaking News

बनावट खत विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार – मंत्री शंभूराज देसाई

Strict action will be taken against fake fertilizer sellers – Minister Shambhuraj Desai

नागपूर, दि. ३० : बनावट खत विक्री करणाऱ्यांना चाप बसावा यासाठी जिल्हास्तरावर भरारी पथक  नियुक्त करून बी-बियाणे, खते यांची गोदामे तपासण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात येतील. अशा  बनावट खत विक्री करणाऱ्या दुकानांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना आजच दिल्या जातील, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली.

बुलढाणा शहरातील सागर कृषी केंद्रात डीएपी खताची पिशवी शेतकऱ्यांना घेण्याकरिता एक वेगळे खत घेण्याची सक्ती केल्याबाबत प्रश्न सदस्य संजय गायकवाड यांनी उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मंत्री श्री. देसाई बोलत होते.

मंत्री श्री देसाई म्हणाले की, बुलढाणा शहरातील सागर कृषी केंद्रात डीएपी खताची पिशवी शेतकऱ्यांना घेण्याकरिता एक वेगळे खत घेण्याची सक्ती करून विक्री केल्याचे निदर्शनास आले आहे. हे दुकान 15 वर्षांपूर्वीचे असून लिंकिंग पद्धतीने खते दिली. याबाबत प्राथमिक चौकशी केली आहे. त्या दुकानाचा दहा  दिवसांसाठी परवाना रद्द केला आहे. असे लिंकिंग पुन्हा होणार नाही यासाठी क्षेत्रिय अधिकारी यांच्यामार्फत अचानक तपासण्या करण्याच्या सूचना  संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. वरिष्ठ जिल्हा कृषी अधिकाऱ्यामार्फत याची चौकशी करून दोषीअंती  संबधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल.

या दुकानाचा पंधरा वर्षे जुना परवाना आहे. यामुळे या दुकानाची पंधरा वर्षांत पहिलीच तक्रार असल्यामुळे परवाना पुन्हा दहा दिवसांनी पूर्ववत केलेला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीत परवानाधारक खत विक्रेत्याने डीपी खतासोबत इतर खते शेतकऱ्यांना सक्ती करून विक्री केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सागर सीड्स अँड फर्टीलायझर यांचा विक्री परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला होता.

परंतु खरीप हंगामामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खत लिंकिंग पद्धतीने विक्री न करण्याबाबात दिलेले हमी पत्र विचारात घेऊन निलंबित केलेला खत विक्री परवाना पूर्ववत करण्यात आला आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य नाना पटोले, राजेंद्र शिंगणे, बाळासाहेब पाटील यांनी सहभाग घेतला.

No comments