विस्तारीत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी युद्ध पातळीवर कार्यवाही करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २ : - जत तालुक्यातील गावांसाठी महत्वाची विस्तारीत म्हैसाळ उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रय़त्न करा. उपसा सिंचन योजना आणि गावागावातील पाणी पुरवठा योजना पुर्ण करण्यासाठी विविध विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी. या कामांसाठी आवश्यक निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.
सीमा भागातील या गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या आरोग्य, शिक्षण, वीज तसेच पायाभूत सुविधा यासाठी संबंधित विभागांनी समन्वय राखून कार्यवाही करावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या.
सह्याद्री राज्य अतिथीगृहात जत तालुक्यातील या गावांच्या विविध प्रश्नांविषयी आयोजित बैठकीस कामगार तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, खासदार संजयकाका पाटील, आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार प्रकाश शेंडगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव अभा शुक्ला, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सचिव संजीव जयस्वाल, सांगलीचे जिल्हाधिकारी एम. राजा दयानिधी, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, या परिसरातील गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विस्तारीत म्हैसाळ उपसा सिंचन योजना आणि गावा-गावांतील पाणी पुरवठा योजनांची कामे यांना गती देणे आवश्यक आहे. विस्तारीत उपसा सिंचन योजनेसाठीची सुधारित प्रशासकीय मान्यता, ते प्रत्यक्ष काम सुरु होणे यासाठी सर्वच पातळ्यांवर कार्यवाहीला गती द्या. एकीकडे तांत्रिक बाबी, आराखडे तसे अनुषंगीक बाबी पूर्ण करण्यावर भर द्यावा. विस्तारीत योजनेतून पाणी मिळवण्याचा टप्पा तसेच वितरण जाळे यांचे काम यांचा ताळमेळ साधा. पाण्यापासून वंचित या गावांना दिलासा देण्यासाठी आणि या गावांसाठीच्या पाणी योजनांसाठी उद्भव स्त्रोत असणाऱे तलावांमध्ये वेळेत पाणी उपलब्ध व्हावे यासाठी सर्व बाबींसाठी कालबद्ध पद्धतीने आणि नेमके नियोजन करा,असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेनंतर आरोग्य सुविधांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण आणि तेथील पदभरती, शिक्षकांची पदभरती, शाळांसाठी आवश्यक निधीसाठीची तरतूद याबाबत विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांनी प्रस्ताव तयार करावेत. याभागातील रस्ते आणि पायाभूत सुविधांबाबत विविध विभागांनी समन्वय राखून कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
विशेषतः जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि तासगांव या तालुक्यात द्राक्ष आणि डाळींबाच्या बागांचा सिंचन हा महत्वाचा मुद्दा आहे. या बागांना दिवसा पाणी देता यावे यासाठी भारनियमनाच्या वेळांमध्ये सवलत देण्यासाठी एमईआरसी आणि विविध यंत्रणांनी विशेष बाब सकारात्मक पावले उचलण्याचे निर्देशही देण्यात आले.
यावेळी झालेल्या चर्चेत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील यांनी पाणी योजनांसाठी सौर ऊर्जा प्रकल्पचा पर्याय वापरण्याची सूचना केली. मंत्री श्री. केसरकर यांनी मराठी भाषा संवर्धन आणि शाळांच्या बळकटीकरणांबाबत सूचना केल्या.
No comments