Breaking News

अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि कर्जमाफी संपूर्ण रक्कम कधी मिळणार : आ. दिपक चव्हाण

When will full amount of heavy rain compensation and loan waiver be received : MLA Deepak Chavan

     फलटण, दि. २७ : अतिवृष्टीने शेती व शेतकऱ्यांच्या संपूर्ण नुकसान भरपाई सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही, ती कधी देणार, अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या परंतू नुकसान झाले त्यांना मदत करणार अशी घोषणा प्रत्यक्षात कधी येणार आणि कर्जमाफी उर्वरित रक्कम कधी मिळणार असे सवाल आ. दिपक चव्हाण यांनी लक्षवेधीद्वारे विचारले आहेत. 

    नागपूर हिवाळी अधिवेशनात आज मंगळवार दि. २७ रोजी सकाळच्या सत्रात आ. दिपक चव्हाण यांनी लक्षवेधी द्वारे सदर प्रश्न सभागृहात उपस्थित केले. तालीका सभापती आ. संजय शिरसाठ त्यावेळी सभापतींच्या आसनावर होते.

      जुलै, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात राज्यात संततधार अतिवृष्टी झाली, त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील ६ ते ७ तालुके अतिवृष्टीने बाधीत झाले. दुबार पेरणी करुन सुद्धा घेवडा, बटाटा, कांदा व सोयाबीन यांसह भाजीपाला आदी हाताशी आलेली पीके वाया गेली. यामुळे शेतकरी काकुळतीला आला. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी नुकसान ग्रस्त भागाचे दौरे करुन मदतीचे आश्वासन दिले मात्र सातारा जिल्ह्यात अद्याप सदर नुकसान भरपाई पूर्ण स्वरुपात मिळाली नसल्याचे आ. दिपक चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले.

       सातारा जिल्ह्यात ३४५०१ शेतकऱ्यांची १० हजार हेक्टर क्षेत्रातील पिके अतिवृष्टीने वाया गेली त्यामध्ये सुमारे २२ कोटी रुपयांचे नुकसान झाले, आतापर्यंत ५ कोटी रुपये देण्यात आले, मात्र उर्वरित १७ कोटी अद्याप न मिळाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचे नमूद करीत सदर रक्कम कधी मिळणार असा सवाल आ. दिपक चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला.

     अतिवृष्टी नुकसान भरपाई देताना निकषात न बसणाऱ्या परंतू ज्यांचे प्रत्यक्ष नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांनी अतिवृष्टीग्रस्त भगाचा दौरा करताना दिले मात्र प्रत्यक्षात नावे जाहीर होताना त्यामध्ये सातारा जिल्ह्याचा उल्लेख नसल्याने  सातारा जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार की नाही असा सवाल जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत उपस्थित केल्यानंतर सर्व बाधीतांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शासनाच्या वतीने दिल्याचे निदर्शनास आणून देत मात्र त्याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आणून देत त्याबाबत काय असा सवालही आ. दिपक चव्हाण यांनी उपस्थित केला.

       सातारा जिल्ह्यात ७५० कोटी कर्ज माफी मिळणार होती, मात्र प्रत्यक्षात केवळ २५० कोटी मिळाले, दुसऱ्या टप्प्यातील यादी आजच प्राप्त झाली असून त्यामध्ये ३०० कोटी रुपये प्राप्त होतील उर्वरित २०० कोटींचे काय असा सवालही आ. दिपक चव्हाण यांनी उपस्थित केला.

     राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी अधिवेशन संपल्यावर तातडीने बैठक घेऊन  प्रलंबीत निधी वितरित केला जाईल असे आश्वासन सभागृहास दिले.

    राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केलेल्या घोषणांची पूर्तता करतात किंबहुना जे करणार त्याच घोषणा करतात याची ग्वाही देत पूर्वी २ हेक्टर असलेली मर्यादा ३ हेक्टर पर्यंत वाढविण्यात आली आणि एन. डी. आर. एफ. च्या निकषाच्या दुप्पट रक्कम देण्याचा निर्णय घेतला असून नियमीत कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष अनुदानाची घोषणा सतत २ वर्षे करण्यात आली मात्र प्रत्यक्षात ते अनुदान आमच्या शासनाने या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचे ही यावेळी पालक मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

No comments