आपदा मित्र योजनेंतर्गत जिल्ह्यात 500 आपदा मित्र प्रशिक्षित होणार
सातारा दि. 20: जिल्ह्यात हमीदा एज्युकेशन सोसायटीज डॉन ॲकॅडमी (सिडनी पॉईंटरोड) पाचगणी ता.महाबळेश्वर येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आपदा मित्र योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकूण 500 आपदा मित्र स्वयंसेवक यांना आपत्ती व्यवस्थापन या विषयाबाबत 12 दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 5 आपदा मित्र स्वयंसेवकांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते प्रातनिधीक स्वरुपात मोफत आपत्कालीन प्रतिसाद किट देण्यात आले. शासनामार्फत या आपदा मित्रांचा सुरक्षा विमा उतरविला जाणार आहे. हे प्रशिक्षण सातारा जिल्ह्यातील दुर्घटना, संभाव्य धोके टाळण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांचे देखरेखीखाली सातारा जिल्हयातील एकूण 500 स्वयंसेवकांना आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षित केले जात आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सातारा जिल्ह्यात होणाऱ्या संभाव्य धोक्यांमध्ये / पूरपरिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासनाला अत्यंत मोलाचे सहकार्य लाभणार आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही आपत्ती अथवा दुर्घटनेत प्रथम प्रतिसाद कमी वेळेत मिळाल्यास जिवीत हानीचे प्रमाण कमी होण्यास हे प्रशिक्षण प्रभावी ठरणार आहे.
या प्रशिक्षणामध्ये आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत आपत्तीपूर्व, आपत्ती दरम्यान, आपत्ती पश्चात नियोजन, आपत्ती व्यवस्थापन बाबत जनजागृती, आपत्ती व्यवस्थापन विषयक आपदा मित्राची भूमिका, आपदा प्रशिक्षणाचा मूख्य हेतू, तसेच आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रात्यक्षिके शोध व बचाव, प्रथमोपचार, गाठींचे प्रकार, दोरखंड गाठी, बॅन्डेज, स्ट्रेचर उचल पध्दती, अपघात ग्रस्तांना वाहून नेण्याच्या पध्दती, अग्निशमन, 108 ॲम्ब्युलन्सचे कामकाज, मॉक ड्रिल सराव तसेच पूर परिस्थिती दरम्यान बोट, बोटीबाबत माहिती, बोट चालविणे, इत्यादी प्रकारचे प्रशिक्षण सरावासह दिले जात आहे. हे प्रशिक्षण यशदा पूणे येथील तज्ञ मास्टर ट्रेनर्स आणि जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख यांचे मार्गदर्शनानूसार संपन्न होत आहे.
No comments