Breaking News

सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यात केंद्र सरकार यशस्वी - ना. अजयकुमार मिश्रा

केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा बोलताना शेजारी व्यासपीठावर खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी मंत्री बाळा भेगडे, प्रशांत परिचारक, जयकुमार शिंदे, धनंजय साळुंखे पाटील, अभिजीत नाईक निंबाळकर वगैरे (छाया- अमित साळुंखे)

Central government successful in providing justice to the common people -  Ajay Kumar Mishra

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.६ - स्वातंत्र्यानंतर ६७ वर्षांनी भारतीय जनता पार्टीची पूर्ण बहुमत घेऊन केंद्रात सत्ता आली आणि सर्वसामान्यांच्या अपेक्षा, अडचणी, समस्यांची जाण असणारा आणि त्याची पूर्तता करण्याची क्षमता असणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने लाभल्यामुळेच देशातील मूलभूत गरजांपासून दूर राहिलेल्या सुमारे ५० कोटी सामान्य जनतेला न्याय देण्यात केंद्र सरकार यशस्वी झाल्याचे स्पष्ट प्रतिपादन भाजपा ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांनी केले.

      माढा लोकसभा मतदार संघात मिशन २०२४ अंतर्गत केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांच्या २ दिवसीय भरगच्च दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये फलटण तालुक्यातील केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना लाभार्थ्याशी सुसंवाद कार्यक्रमात ना. मिश्रा बोलत होते. यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, राज्य प्रवास संयोजक माजी आमदार बाळा भेगडे, लोकसभा प्रभारी माजी आमदार प्रशांत परिचारक, धनंजय साळुंखे पाटील, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर,  लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे, भाजप तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, सुशांत निंबाळकर, अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, राजेंद्र नागटीळे,  जिल्हा सरचिटणीस सौ. मुक्ती शहा, राहुल शहा यांच्या सह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लाभार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 

      केंद्रात कृषी व अन्य खात्यांची जबाबदारी अनेक वर्षे सांभाळलेले, राज्याचे मुख्यमंत्रीपद ज्यांच्याकडे अनेक वेळा होते आणि कोणीही मुख्यमंत्री असला तरी सत्तेचे सुकाणू  यांचेकडे असलेले खा. शरद पवार यांनी किंवा त्यांच्या काँग्रेस सरकारांनी कधी सर्वसामान्यांचा, त्यांच्या प्रश्नांचा विचार केला नसल्याचे सांगत त्या अपेक्षेने देशभर मतदारांनी भाजपचे कमळ स्विकारले, या मतदार संघातही आपण तो निर्णय घेतला म्हणून खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची धमक असलेला लोकप्रतिनिधी तुम्हाला लाभला, त्यांना पंतप्रधान मोदींच्या निर्णायक कर्तुत्वाची साथ लाभल्याने सर्वाधिक योजना येथे प्रभावी रीतीने राबविल्या गेल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांनी निदर्शनास आणून दिले.

       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळे पंतप्रधान आवास योजनेतून गरजूंना घरे, महिलांना स्वयंपाकाचा गॅस, शेतकऱ्यांना कृषीची औजारे, तंत्रज्ञान, अनुदान स्वरुपात निधी, मोफत वैद्यकिय सेवा सुविधा, जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे घरात पाण्याची सुविधा, दर ४ महिन्याला २ हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा करणारी अनोखी योजना वगैरे अनेक बाबी लाभल्याने या देशातील शेतकरी, कामगार, महिला सर्वच समाज घटक सुखी समाधानी झाल्याचे अनेक उदाहरणे देत ना. मिश्रा यांनी निदर्शनास आणून दिले.

    प्रारंभी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ना. मिश्रा व अन्य मान्यवरांसह सर्व उपस्थितांचे, लाभार्थी स्त्री - पुरुष आणि ग्रामस्थांचे स्वागत केल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत लवकरच फलटण तालुक्याच्या विविध भागातून जाणाऱ्या कोट्यवधी रुपये खर्चाच्या राष्ट्रीय महामार्गाचे भूमिपूजन तसेच नाईकबोमवाडी औद्योगिक वसाहत आणि नीरा - देवघर कालव्याच्या कामाचा शुभारंभ, सातारा - फलटण महामार्गाचे कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे सांगून स्वातंत्र्यानंतर देशात अनेक सरकारे आली पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखे लोकहितकारी सरकार या देशात यापूर्वी कधीच आले नसल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

   शेतकऱ्यांना सन्मान, शेतकऱ्यांना पेन्शन, शेतकऱ्यांना अडीअडचणीत अर्थसहाय्य, गरजूंना मोफत अन्नधान्य, आळंदी - पंढरपूर मार्गावरुन प्रतिवर्षी जाणाऱ्या लक्षावधी वारकरी भाविकांच्या पायाची, सुरक्षेची काळजी घेत लक्षावधी रुपये खर्च पालखी महामार्गाची उभारणी, जल जीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करुन प्रत्येक कुटुंबाला घरात पाण्याचा नळ, अनेक रस्त्यांची उभारणी, ३० वर्षांहून अधिक काळ प्रलंबीत असलेला रेल्वेचा प्रश्न चुटकी सरशी सोडवून प्रत्यक्ष रेल्वे वाहतूक सुरु, देशाला जागतिक स्तरावर मान सन्मानच नव्हे भारताचा दबदबा निर्माण करणारे मोदींचे सरकार निश्चित वेगळे सरकार आहे आणि ते तुम्ही घेतलेल्या निर्णयामुळे सत्तेवर आले असल्याचे सांगत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मतदारांना धन्यवाद दिले. 

    माजी मंत्री बाळा भेगडे यांनी मार्गदर्शन केले तर जयकुमार शिंदे, प्रा. सतीश जंगम यांनी सूत्रसंचालन केले.

No comments