अतिक्रमण हटाव मोहिमेच्या विरोधात आज जिल्हाधिकारी यांची भेट - ॲड. नरसिंह निकम
ॲड. नरसिंह निकम यांच्या नेतृत्वाखाली शहरातुन काढण्यात आलेली शांतता फेरी |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १ : बेकायदेशीरपणे सुरू असणाऱ्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या निषेधार्थ आज व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या फलटण बंदला, शंभरटक्के प्रतिसाद मिळाला आहे, त्यामुळे आपण निम्मी लढाई जिंकली आहे. उद्या आपण सर्वांसह जिल्हाधिकारी यांची भेट घेवून, अतिक्रमण हटाव मोहिम थांबविण्याचे लेखी आदेश मुख्याधिकारी व तहसिलदार यांना द्यावेत अशी मागणी सर्वांच्यावतीने करणार असल्याचे फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम यांनी स्पष्ट केले आहे
शहरातील मध्यवर्ती बाजार पेठेतील बंद ठेवण्यात आलेली दुकाने |
अतिक्रमण हटाव मोहिमेच्या निषेधार्थ आज व्यापाऱ्यांनी फलटण बंद ठेवत शहरातुन शांतता फेरी काढली. सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास शहरातील बारामती चौक ( माता रमाई चौक ) येथुन शांतता फेरीस प्रारंभ झाला, यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरुन निघालेल्या या फेरीची सांगता प्रारंभ झालेल्या ठिकाणीच करण्यात आली, त्यावेळी मार्गदर्शन करताना ॲड निकम बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, फिरोज आतार, मनसेचे युवराज शिंदे, आझाद समाज पार्टीचे मंगेश आवळे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष वसीम मणेर यांच्यासह विविध पक्षांचे, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
आपली लढाई केवळ स्थानिक प्रशासनाशी आहे अन्य कुणाशीही नाही. सर्वांच्या एकजूटीतुन प्रशासकीय पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांसह मंत्री, मुख्यमंत्री यांनाही भेटून त्यांच्यासमोर आपला प्रश्न मांडणार असल्याच सांगुन ॲड निकम म्हणाले, आज व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. उद्या सातारा येथे जिल्हाधिकारी यांना भेटायला सातारा येथे जायचे आहे. त्यांना भेटण्यासाठी सर्वांनी मोठ्या संखेने यावे असे आवाहन यावेळी ॲड. नरसिंह निकम यांनी केले.
दरम्यान आज फलटण बंदच्या हाकेला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. सकाळी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. शहरातुन निघालेल्या शांतता फेरीस मोठा प्रतिसाद मिळाला. फेरी पार पडल्यानंतर दुपारनंतर सर्व व्यवहार सुरळीतपणे पार पडण्यास सुरुवात झाली. यावेळी काढण्यात आलेल्या शांतता फेरीत हातगाडी धारक, टपरीधारक, गाळे धारक, फळ विक्रेते, लघु व्यावसायीक व महिला मोठ्या संखेने सहभागी झाले होते.
No comments