Breaking News

फलटणची अतिक्रमण मोहीम थांबवण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

Collector's order to stop encroachment campaign of Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ५ डिसेंबर  : फलटण शहरात सुरु करण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहिम, अतिक्रमणाबाबत सर्व्हे करुन अतिक्रमणे अधोरेखित केल्याशिवाय, अतिक्रमणे काढणेची कोणतीही कार्यवाही करणेत येवू नये. तसेच तोपर्यंत चालू असलेली अतिक्रमण काढणेची मोहिम थांबविणेत यावी असे आदेश  फलटण विभागाचे उपविभागीय अधिकारी व फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज दि.५/१/२०२३ रोजी दिले.

         फलटण शहरात सुरु असलेली अतिक्रमण हटाव मोहिम बेकायदेशीर आहे व त्यात गरीब व धनदांडगे असा भेदभाव केला जात असल्याच्या विरोधात  फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम यांच्या नेतृत्वाखाली दि.२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घेवून, त्यांना निवेदन दिले होते. त्यावेळी फलटण शहरात सुरु करण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहिम ही सर्व कायदेशीर बाबी व प्रक्रिया यांचा अवलंब करुन करावी. यानुषंगाने भविष्यात कोणतीही प्रशासकीय अडचण उदभवणार नाही याची कटाक्षाने दक्षता घेण्याचे निर्देश  फलटण विभागाचे उपविभागीय अधिकारी व फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना जिल्हाधिकारी, सातारा कार्यालयाकडून देण्यात आले होते.

    त्यानंतर आज पुन्हा, ॲड नरसिंह निकम, मा. नगरसेवक अशोकराव जाधव, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष वसीम मणेर यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली.  चर्चेदरम्यान, अतिक्रमण हटाव मोहिम राबविताना नगरपालिका प्रशासनाकडून नोटिसा बजाविण्यात आल्या नाहीत, अतिक्रमणे काढून घेण्यास मुदत देण्यात आली नाही. अतिक्रमण मोहिम राबविताना टाऊन प्लॅनिंगनुसार सर्व्हे करण्यात आला नाही. अतिक्रमण राबविताना आत असलेल्या मालासह टपऱ्या, हातगाड्यांवर जेसीबी चालविण्यात आला. गरीबांची अतिक्रमणे हटविली परंतू धनदांडग्यांच्या अतिक्रमणे हटविली नसल्याचे सांगितले. 

          या नंतर जिल्हाधिकारी जयवंशी यांनी, आज पुन्हा, अतिक्रमण मोहीम सर्व कायदेशीर बाबी व प्रकिया यांचा अवलंब करुन तसेच सहा. संचालक नगररचना सातारा यांनी अतिक्रमणाबाबत सर्व्हे करुन, अतिक्रमणे अधोरेखित केल्याशिवाय उक्त अतिक्रमणे काढणेची कोणतीही कार्यवाही करणेत येवू नये. तसेच तोपर्यंत चालू असलेली अतिक्रमण काढणेची मोहिम थांबविणेत यावी असे आदेश  फलटण विभागाचे उपविभागीय अधिकारी व फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिले.

No comments