Breaking News

पालखी मार्ग व चौक सुशोभीकरणासाठी ८० कोटींच्या निधीची मागणी - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

Demand for 80 crore funds for development of Palkhi Marg and Chowk - MP Ranjitsinh

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -   छत्रपती शिवाजी महाराज यांची सासरवाडी व छत्रपती संभाजी महाराजांचे आजोळ असलेले फलटण शहर हे प्राचीन व ऐतिहासिक शहरासह दक्षिण काशी म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना, मध्य ठिकाण म्हणूनही फलटण कडे पाहिले जाते. केंद्र शासनाच्या रस्ते विकास मंत्रालयाने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम हातात घेतले असून ते वेगाने चालू आहे, त्यामुळे फलटण शहराला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. परंतु महामार्ग शहराच्या बाहेरून जात असल्याने फलटण शहरातील अंतर्गत पालखी महामार्गाचे डी. पी. आर मध्ये समाविष्ट करण्यासह सुशोभीकरणासाठी ८० कोटी रुपयांच्या निधीची मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रस्ते विकास मंत्री ना. नितीन गडकरी यांना भेटून लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे.

     फलटणमधील पालखी महामार्गावरील मलठण, उंबरेश्वर चौक, पाचबत्ती चौक, श्रीराम मंदिर, गजानन चौक, महात्मा फुले चौक, श्रीमंत मालोजीराजे पुतळा ते गिरवी नाका व विमानतळ व रिंग रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, डीएड चौक, संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर मार्ग या ठिकाणी सुशोभीकरण करण्यासाठी अंदाजे ८० कोटी रुपये मंजूर करून, फलटणमधील सर्वच ठिकाणी विविध विकास कामे करण्यासाठी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधीची मागणी केली आहे. यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे फलटण शहर हे ऐतिहासिक शहर असून आळंदी पंढरपूर मार्गावर असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्गावर असलेल्या फलटण शहरातील अंतर्गत पालखी मार्ग व प्रत्येक चौकात सुशोभीकरण व्हावे व ते करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करीत त्यासाठी प्राधान्याने ८० कोटी रुपयांची मागणी केली आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करून, लवकरच निधी दिला जाईल असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

No comments