फलटण येथे वृद्धाची फसवणूक ; एटीएम कार्ड बदलून १८ हजार लंपास
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३० - येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरमध्ये वृद्धाचे एटीएम कार्ड बदलून, त्या एटीएमकार्डद्वारे सातारा येथून १८ हजार रुपये काढून वृध्दाची फसवणूक केल्याप्रकरणी दोन आज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. १८/१/२०२३ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास विश्वास नारायण चव्हाण वय ६७ वर्षे रा. चव्हाणवाडी ता. फलटण हे पैसे काढण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, उपळेकर मंदीराच्याशेजारी फलटण येथे गेले होते. त्यावेळी पैसे काढत असताना चव्हाण यांच्या पाठीमागे दोन अनोळखी इसम उभे होते. चव्हाण यांनी ए.टी.एम मशिनमध्ये ए.टी.एम कार्ड टाकून ५ हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पैसे निघाले नाहीत, त्यानंतर परत त्याच ए.टी.एम मध्ये ए.टी.एम कार्ड टाकून २ हजार रूपये काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पैसे निघाले नाहीत. नंतर चव्हाण ए. टी. एम मधून बाहेर येवून आय.डी.बी.आय बँक शाखा फलटण येथील ए.टी.एम मशिनमध्ये ए.टी.एम कार्ड टाकून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पैसे निघाले नाहीत म्हणून चव्हाण त्यांच्या गावी चव्हाणवाडी येथे गेले. मोटार सायकलवर जात असताना चव्हाण लोणंद येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथील ए. टी. एम मशिनमध्ये पैसे काढण्यासाठी गेले, परंतु तेथेही पैसे निघाले नाहीत. चव्हाण घरी गेल्या नंतर झाला प्रकार आपल्या पत्नीस सांगितला, पत्नीने ए.टी.एम कार्ड पाहिले तेव्हा ए.टी.एम कार्ड वर विश्वास चव्हाण ऐवजी अनुसया बामणे यांच्या नावाचे ए.टी.एम. कार्ड असल्याचे निर्देशानास आले. त्यानंतर चव्हाण दिनांक १९/१/२०२३ रोजी सकाळी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा लोणंद येथे जावून पुस्तक भरून घेतले असता, त्यात जय भवानी कॉम्प्लेक्स सातारा येथून १०,०००/- रुपये व ८,०००/- रुपये काढल्याच्या दोन नोंदी चव्हाण यांना दिसल्या. फलटण येथील स्टेट बँक एटीएम सेंटरमध्ये त्या दोन अनोळखी इसमांनी चव्हाण यांच्या वयाचा गैरफायदा घेवून, नजर चुकवून ए.टी.एम कार्ड बदलले. व त्यांच्या अकाऊंन्टमधून एकूण १८,०००/- रूपये लंपास करून फसवणूक केली असल्याची फिर्याद विश्वास नारायण चव्हाण यांनी दिली आहे.
No comments