अवैध सावकारी ; पिंप्रद येथील एकावर गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १८ : तीन टक्के व्याजदराने दिलेल्या २ लाख ७५ हजार रुपयांच्या मोबदल्यात, वेळोवेळी ५ लाख ७५ हजार रुपये देवूनही, गहाण ठेवून घेतलेली चारचाकी परत देण्यास नकार देत, आणखी व्याजापोटी ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी पिंप्रद ता. फलटण येथील एक जणाविरुध्द महाराष्ट्र सावकारी अधिनियमाद्वारे ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
संतोष नानासो धुमाळ रा. प्रिंपद ता. फलटण असे गुन्हा नोंद झालेल्या संशयीताचे नाव आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातुन मिळालेली माहिती अशी की, ज्ञानेश्वर बाळासो शिंदे वय ३८ रा. पिंपरी ता. फलटण यांना ऊस तोड टोळी आणण्यासाठी पैशाची गरज असल्याने त्यांनी आक्टोंबर २०१८ साली संतोष धुमाळ यांच्याकडून तीन टक्के व्याज दराने २ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम धनादेशाद्वारे घेतली होती व शिंदे यांची कार एमएच ४२ एल ९३९३ ही स्वतःकडे गहाण म्हणुन ठेवून घेतली होती. शिंदे यांनी आक्टोंबर २०१८ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत धुमाळ यांना ३ लाख ७५ हजार रुपये व्याजाच्या स्वरुपात दिले. १० जानेवारी २०२३ रोजी शिंदे यांनी धुमाळ यांना २ लाख रुपये रोख दिले, परंतू त्यांनी व्याजापोटी आणखी ५० हजार रुपयांची मागणी केली. दि. १७ जानेवारी २०२३ रोजी शिंदे हे धुमाळ यांच्याकडे गहाण ठेवलेली आपली कार आणण्यासाठी त्यांच्याकडे गेले असता, त्यांनी व्याजाची रक्कम दिल्या शिवाय मी तुला गाडी परत देणार नाही, असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली. याबाबत ज्ञानेश्वर शिंदे यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असुन संतोष धुमाळ यांच्याविरुध्द महाराष्ट्र सावकारी अधिनियमाद्वारे गुन्हा नोंद झाला आहे. पुढिल तपास पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे करीत आहेत.
No comments