Breaking News

दोन्ही हायवे लिंक झाले तर जिल्ह्यात औद्योगिकीकरण वाढेल - श्रीमंत रामराजे यांची ना. गडकरी यांच्याकडे मागणी

 Industrialization will increase in the district if both the highways are linked - Shrimant Ramraje's demand to Nitin Gadkari

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २७ -  सोळशी वरून तडवळे किंवा जोशी विहिरीवरून तडवळे असा लिंकिंग रोड आपण जुन्या बेंगलोर हायवेला जोडावा तसेच नवीन ग्रीन फील्ड हायवे  देखील  लिंक करावा. दोन हायवे  लिंक झाले तर, याचा डायरेक्ट परिणाम सातारा जिल्ह्याच्या औद्योगिकीकरणावर होणार आहे, रस्त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर असल्याशिवाय उद्योग येणार नाहीत, त्यामुळेच  ना. नितीन गडकरी यांच्याकडे काही मागण्या केल्या असल्याचे विधान परिषदेत माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक यांनी सांगितले.

विकास करत असताना गडकरी साहेब पक्ष बघत नाहीत, ते विकास हाच केंद्रबिंदू मानतात. काम सकारात्मक असेल तर लगेच हो म्हणून, त्या कामाला मंजुरी देत असतात, आज ते फलटण मध्ये आल्यानंतर मी काही मागण्या केल्या आहेत त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी  अपेक्षा विधान परिषदेत माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक यांनी व्यक्त केली.

फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिरवळ , भोर आणि नीरा खोऱ्यातील औद्योगिक विकास आणि औद्योगिक वाहतुकीतील वाढ लक्षात घेता वरंधा घाट - भोर - शिंदेवाडी चौपदरीकरणाची गरज आहे . सोळशी - सोनके - पिंपोडे बु. तडवळे असा रस्ता तयार करून सदरील रस्ता हा पुणे ते बंगलोर महामार्गास जोडण्यात यावा. यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून विशेष निधी मंजूर करण्यात यावा. यासोबतच शिरवळ ते लोणंद या रस्त्याचे अर्धवट राहिलेले काम पूर्णत्वास नेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत, पालखी - महामार्गावरील तांबमाळ येथून ते फलटण सातारा रोड ते फलटण औंध रोड असा रस्ता तयार करण्यात यावा अशीही मागणी केली असल्याची माहिती यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. 

पालखी महामार्गावरील तांबमाळ ते वाठार निंबाळकर फाटा व अब्दागिरेवाडी ते झिरपवाडी असा नूतन रस्ता तयार करून फलटण ते सातारा मार्गास पालखी मार्ग जोडण्यात यावा. फलटण ते सांगली रस्ता हा पालखी महामार्गास जोडण्यात यावा. यामुळे प्रस्तावित असलेल्या रिंग रोड पूर्णत्वास जाईल, अशी सुद्धा मागणी ना. नितीन गडकरी यांच्याकडे केली असल्याची माहिती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

फलटण शहरातील असणाऱ्या रिंग रोड म्हणजेच मुधोजी कॉलेज - विमानतळ पृथ्वी चौक - नाना पाटील चौक या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात यावे यामुळे फलटण शहराच्या वैभवात भर पडेल;  जिंती नाका ते  विमानतळापर्यंत व तेथून नाना पाटील चौक पर्यंत जाणारा रस्ता पालखी महामार्ग अंतर्गत करावा. त्यासाठी निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी ना. नितीन गडकरी यांच्याकडे केली असल्याची माहिती श्रीमंत रामराजे यांनी यावेळी दिली. 

No comments