सक्षम व व्यसनमुक्त तरुण पिढी घडविणे काळाची गरज : डॉ. प्रभाकर पवार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - व्यसनांचे वाढते प्रमाण, हे युवा पिढीसाठी खूप घातक आहे. आजचा युवक या व्यसनामुळे दिशाहीन भरकटलेल्या अवस्थेत फिरताना दिसतो आहे, व्यसनाच्या आधीन गेल्यामुळे, तो आपला परिवार सुखी आनंदी ठेवू शकत नाही. दारू पिणे, नशापान करणे, सिगारेट, पान, तंबाखू हे आपल्या शरीराला नष्ट करतात. आरोग्य हे धनसंपदा आहे, हे आजच्या युवकाने जाणायला हवे, हळूहळू आजचा युवक हा एकलकोंडा होत चालला आहे, संवाद हरवत चालला आहे, बोलणे कमी झाले, सतत मोबाईलवर समाज माध्यमे, गेम्स, पिक्चर, दिवस रात्र जागरण व त्याचा परिणाम म्हणून आरोग्याची समस्या पुढे येत आहे, डोळ्याचे विकार पुढे येत आहेत, मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे म्हणून पालकांनी संपूर्ण जबाबदारी सांभाळून मुलांकडे लक्ष देण्याची आज गरज आहे. त्याचबरोबर सक्षम व व्यसनमुक्त तरुण पिढी घडविणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांनी केले.
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कृत विशेष श्रमसंस्कार शिबिर सन २०२२-२३ मौजे जावली, तालुका फलटण, जि. सातारा येथे दि. १७ जानेवारी २०२३ रोजी शिबिराच्या प्रबोधनपर व्याख्यानमाला कार्यक्रम प्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. डॉ. प्रभाकर पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता होते.
पुढे बोलताना प्रा. डॉ. प्रभाकर पवार म्हणाले की, आजच्या युवका समोर खूप मोठी आव्हाने, समस्या पुढे येऊन थांबल्या आहेत. सुशिक्षित बेकारी, नोकरी न मिळणे, मिळाली तर त्या नोकरीत समाधान नसणे, आर्थिक विवंचना, नोकरी न टिकणे तसेच देशातील लोकसंख्या विस्फोट हेच सर्वात महत्त्वाचे आव्हान आहे. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा व स्पर्धकांची अफाट संख्या, परीक्षेतून निवड, हजारोंच्या संख्येने अर्ज व शेवटी पदरी निराशा. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण जीवनात प्रत्यक्षात उपयोगी पडत आहे का? फक्त नोकरी पुरतेच शिक्षण, आर्थिक विकासासाठी शिक्षण एवढे मर्यादित स्वरूप आहे का? असा आज प्रश्न पडतो आहे.
शिक्षणासाठी किंवा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर युवकांसमोर आर्थिक संकट उभे राहते. कमी पगारावर नोकरी करणे, घरापासून, गावापासून खूप दूर च्या अंतरावर नोकरी करावी लागते ही फार मोठी समस्या व आव्हान आहे. आपले घर, परिवार, आपली माणसे यांच्यापासून कुठेतरी दूर नोकरीच्या शोधात भटकावे लागते ही फार मोठी समस्या आधुनिक युवका समोर दिसून येत असल्याचे प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांनी सांगितले.
या व्याख्यानमाला कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता यांनी आजच्या तरुण युवकांनी काळाचा अभ्यास करून, परिस्थितीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. आपला स्वतःचा कल, स्वतःवर असलेला आत्मविश्वास, स्वावलंबीपणा, सकारात्मकतेने विचार पूर्वक आपले शिक्षण, आपली नोकरी, आपले क्षेत्र निवडले पाहिजे तरच त्या दिशेने अधिक प्रगती होते. जो व्यक्ती चुकीच्या रस्त्याने धावण्यापेक्षा योग्य दिशेने कासवासारखे धावत राहिले तर नक्कीच यश मिळते. भविष्यात देशासमोरील, समाजासमोरील तसेच प्रत्येक युवकासमोरील सर्वात मोठे जटिल आव्हान म्हणजे भ्रष्टाचार होय. आज प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळलेला दिसून येतो, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भ्रष्टाचाराची लागण झालेली दिसून येते, भ्रष्टाचार कमी होण्यासाठी पुढाकार युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता यांनी केले.
राष्ट्रिय सेवा योजना पुरस्कृत श्रमसंस्कार शिबिर अंतर्गत व्याख्यानमाला प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य तथा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, जावलीचे चेअरमन व पत्रकार श्री. राजकुमार गोफणे, प्रा.एस पी. तरटे, प्रा. एम.एस बिचुकले,कार्यक्रम अधिकारी, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण, प्रा. टी.एन शेंडगे, कार्यक्रम अधिकारी, अभियांत्रिकी महाविद्यलय, फलटण, जावली गावातील युवक, ग्रामपंचायत सदस्य, महिला भगिनी, बहुसंख्येने उपस्थित होते.
No comments