नाचणी, वरई, बाजरी, ज्वारी; तृणधान्य आहेत पौष्टिक भारी
Gandhawarta SPECIAL - आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष-2023 निमित्त लेख
पौष्टिक तृणधान्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी तसेच तृणधान्याचा आहारांमध्ये समावेश करण्यासाठी सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने ‘मकर संक्रांती भोगी’ हा दिवस ‘पौष्टिक तृणधान्य दिवस’ म्हणून घोषित केला आहे. तृणधान्याचे आहारातील महत्त्व नागरिकांना पटवून देण्यासाठी कृषि विभागाच्यावतीने वर्षभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहेत.
तृणधान्य सेवनाचे अनेक फायदे आहेत त्याविषयी राज्याचे कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांनी दिलेल्या माहितीवर आधारित लेख…..
भारत हा जगातील सर्वात मोठा पौष्टिक तृणधान्य उत्पादक देश आहे. आजकालची तरुण पिढी आरोग्यदायी खाणे व राहणे यावर लक्ष केंद्रित करत आहे. तृणधान्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तंतुमय पदार्थ असल्यामुळे याकडे लोकं ‘सुपरफूड’ म्हणून पाहू लागले आहेत. बदलत्या जीवनशैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी तृणधान्याचा आहारात समावेश करणे ही काळाची गरज आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा यासारखे पौष्टिक तृणधान्ये ही कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्व आणि खनिजांनी समृद्ध आहेत.
पौष्टिक तृणधान्य पिकाचे उत्पादन प्रामुख्याने कोरडवाहू भागात होते. कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांची पौष्टिक तृणधान्याची पीक पद्धती टिकून रहावी, याकरिता सुधारित बियाणे व अवजारे यांचा विविध योजनांद्वारे पुरवठा करुन उत्पादकता वाढवण्यावर महाराष्ट्र शासनातर्फे भर देण्यात येणार आहे. तसेच शासनातर्फे पौष्टिक तृणधान्य पिकाच्या प्रक्रिया व मूल्यसाखळी विकसनावर भर देण्यात येत आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांकडून उत्पादित मालाचे मूल्यवर्धन होईल.या निमित्ताने पौष्टिक तृणधान्याचा खप वाढेल आणि त्याचा फायदा कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांच्या उत्पादनाला अधिक भाव मिळवून देण्यास सहाय्यभूत ठरेल.
ज्वारी : रक्तातील सारखेची पातळी नियंत्रित करते. रक्ताभिसरण वाढवते. ज्वारी वजन कमी करण्यास मदत करते. हाडांच्या आरोग्यासाठी ज्वारी उपयुक्त ठरते. शरीरातील ऊर्जा पातळी सुधारते. तसेच ह्रदयाचे आरोग्यही ज्वारीमुळे सुधारते.
बाजरी : बाजरीमध्ये कॅल्शियम, विटामिन A, B व फॉस्फरस, लोह, मँगेनीज अधिक मात्रेत उपलब्ध असते. रक्तातील मेदाचे प्रमाण नियंत्रित, रक्तदाबावर नियंत्रण, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी व ॲनेमिया आजारावर मात करण्यासाठी बाजरी उपयुक्त आहे.
नाचणी : शक्तीवर्धक, पित्तशामक असल्याने नाचणी रक्त शुद्ध करण्यास उपयुक्त आहे. कॅल्शियम आणि लोह मुबलक असल्याने गरोदर माता व वयोवृद्ध व्यक्तींना हाडांसाठी व ॲनिमियावर नाचणीचे पदार्थ उपयोगी ठरतात. नाचणीमुळे लठ्ठपणा कमी करणे, मधुमेही रुग्णांसाठी गुणकारी, यकृतातील चरबी कमी करण्यास मदत होते.
राळा : यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढवते. त्यातील अँटीऑक्सिडन्ट हा गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. मोड आलेले राळा खाल्ल्यास हाडांचा ठिसूळपणा कमी होऊन हाडे बळकट होतात. तसेच अर्धशिशी, निद्रानाश, कॉलरा, ताप यांच्या उपचार पद्धतीमध्ये राळ्याचा प्रामुख्याने वापर होतो.
वरई : नवजात शिशु, बालक आणि माता यांच्यासाठी उत्तम पोषकधान्य आहे. सदृढ आरोग्य व रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यास वरई उपयुक्त आहे. वरई मधुमेह, ह्रदयरोग यासारख्या रोगांचा धोका कमी करते.
No comments