Breaking News

मकर संक्रांतीनिमित्त सीतामातेला वाण - वसा देण्यासाठी यावर्षी जवळचा मार्ग उपलब्ध

On the occasion of Makar Sankranti, the nearest route is available this year to give vaana-vasa to Sitamata
    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  : सीतामाई घाट रस्त्याचे काम पूर्ण झाले नसले तरी यावर्षी महाराष्ट्राच्या विविध भागातून मकर संक्रांत निमित्त सीतामातेला वाण - वसा देण्यासाठी  जाणाऱ्या माता भगीणीसाठी  रस्त्याचे अर्धे अधिक अंतर कमी झाल्याने माता भगिनी या रस्त्याने जाऊ शकतात इतपत हा रस्ता चांगला झाला आहे. परिणामी यावर्षी मकर संक्रांतीला महिलांची गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रस्ता परिपूर्ण नसला तरी वाहतूक सुरु झाली आहे.
       कुळकजाई, ता. माण येथील सीतामाई या पुरातन देवस्थानला जाऊन सीता मातेला वाण - वसा देण्याची परंपरा फार पूर्वी पासून सुरु आहे, मात्र बारामती, इंदापूर, खंडाळा, फलटण तालुक्यांसह पुणे व सातारा जिल्ह्याच्या या भागातून येणाऱ्या भाविकांना ताथवडा घाटातून राजापूर मार्गे कुळकजाई किंवा सीतामाई देवस्थान हे अंतर फलटण पासून ५४ कि. मी. असल्याने अलीकडे अनेकांनी प्रतिवर्षी तेथे जाणे कमी केले होते, यावर्षी फलटण - वेळोशी - उपळवे - कुळकजाई हा रस्ता चांगला झाला असून सीतामाई घाट रस्त्याचे काम अपूर्णावस्थेत असले तरी वाहतूक सुरु झाली आहे, अर्धा घाट रस्ता डांबरी झाला असून उर्वरित काम बाकी आहे, बाजूच्या संरक्षक कठड्याची कामे अपूर्ण असल्याने सदर संपूर्ण रस्ता अगदी चांगला आणि सुरक्षीत झाला नसला तरी वाहतुकीस  सुरुवात झाली आहे. परिणामी अवघे २७ कि. मी. अंतर पार करुन सीता माईचे दर्शन होणार आहे.
        सन १९८३ मध्ये तत्कालीन आमदार स्व. सू. शं. तथा चिमणराव कदम यांच्या प्रयत्नाने राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रामप्रसाद बोराडे यांच्या हस्ते घाट रस्त्याचे भूमिपूजन समारंभपूर्वक करण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्र विधान सभा तत्कालीन उपसभापती शंकरराव जगताप, आ. चिमणराव कदम, सातारा जिल्हा परिषद तत्कालीन उपाध्यक्ष शंकरराव गाढवे, बांधकाम खात्याचे तत्कालीन मुख्य अभियंता शिंपी, फलटण पंचायत समिती तत्कालीन सभापती विष्णुपंत गाडे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते. त्यावेळी स्व. चिमणराव कदम यांनी वारुगड व रेडे घाट या अन्य २ घाट रस्त्यांच्या कामांना मंजूरी घेऊन सदर घाट रस्ते पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला होता.
     त्यानंतर सन १९८६ मध्ये रोहयो मधून या घाट रस्त्याचे काम तत्कालीन रोजगार हमी समितीचे अध्यक्ष या पदाच्या माध्यमातून ना. चिमणराव कदम यांनी मंजूर करुन घेऊन काम प्रत्यक्ष सुरु केले, त्यानंतर पुन्हा रखडलेले रस्त्याचे काम कळसकरवाडी, श्रीपालवण वगैरे स्थानिक ग्रामस्थांनी सन १९९९ मध्ये  २ लाख रुपये लोकवर्गणी काढून काम पुढे नेण्याचा प्रयत्न केला,  मात्र त्या दरम्यान पाऊस झाल्याने अपूर्ण काम वाहुन गेले, त्यानंतर आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सीतामाई, वारुगड आणि रेडे घाट या फलटण तालुक्यातून कराड, कोल्हापूर व पुढे जाणाऱ्या रस्त्यांना जोडणाऱ्या कामांसाठी निधीच्या तरतुदी करुन घेऊन ३ ही घाट रस्त्यांच्या कामांना गती देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. मात्र सीतामाई घाट रस्त्याशिवाय अन्य २ घाट रस्ते वन खात्याच्या जमिनीतून जात असल्याने ती कामे रखडली आहेत. मात्र सीतामाई घाटाचे काम त्यावेळी पुढे सुरु करण्यात आले होते.
          खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सीतामाई घाट रस्त्याला प्राधान्य देवून फलटण - उपळवे - वेळोशी - कुळकजाई या रस्त्याच्या कामासाठी तरतुदी करुन घेतल्या आहेत. घाटा सह रस्ता पूर्णत्वास जात असताना सदर संपूर्ण रस्ता ३.७५ मी. ऐवजी ५.५ मीटर रुंदीचा करण्यासाठी नव्याने केंद्र शासनाकडून भरीव निधी मंजूर करुन घेतला असून फलटण बाजूकडून २६ कि. मी. रस्ता रुंदीकरणासाठी २५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. आगामी काळात या संपूर्ण रस्त्याचे रुंदीकरण अपेक्षीत आहे. 
    एकूणच सन १९८३ पासून म्हणजे सुमारे ४० वर्षांपूर्वी सुरु झालेले घाट रस्त्यासह अवघ्या २७ कि. मी. अंतरातील रस्त्याचे काम अद्याप पूर्ण नसले तरी किमान त्या रस्त्याने जाता येईल इतपत झाले आहे. प्रत्यक्ष डांबरीकरणासह संपूर्ण रस्ता पूर्ण होण्यास आणखी किती कालावधी लागेल सांगता येणार नाही.

No comments