अतिक्रमण मोहीमेच्या निषेधार्थ फलटण बंद ! ; एकही बांधकाम पाडू देणार नाही - ॲड. नरसिंह निकम
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३१ डिसेंबर - फलटण नगर पालिकेचे मुख्याधिकारी व तहसीलदार यांनी सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहीमेच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांच्या वतीने नवीन वर्षाच्या सुरवातीलाच १ जानेवारी २०२३ रोजी रविवारी फलटण बंद चे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान फलटण शहरात सुरू असणारी अतिक्रमण हटाव मोहीम ही बेकायदेशीर आहे. यासंदर्भात तुम्हाला नगर विकास खात्याकडून किंवा टाउन प्लॅनिंग अधिकाऱ्यांकडून अतिक्रमणे काढण्याचे आदेश आले आहेत का? किंवा हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत का? असतील तर आम्ही आमची अतिक्रमणे आमच्या हाताने पाडून टाकू, परंतु तुमच्याकडे जर आदेश नसतील तर तुम्ही ही अतिक्रमणाची मोहीम थांबवली नाही, तर येथे आमच्या रक्ताचे पाठ वाहिले तरी चालतील, परंतु एकही बांधकाम आम्ही पाडू देणार नाही असा इशारा ॲड. नरसिंह निकम यांनी दिला.
श्रीमंतांनी, नेते मंडळी यांनी केलेली अतिक्रमणे तुम्हाला दिसत नाहीत का? ती अतिक्रमणे पाडणार नसाल तर आम्ही आमचीही अतिक्रमणे पाडू देणार नाही, आम्ही असे म्हणत नाही की त्यांची अतिक्रमणे पाडा, त्यांची ही अतिक्रमण ठेवा व आमचीही अतिक्रमणे ठेवा, कोणत्याही खात्याचे किंवा न्यायालयाचे आदेश नसताना देखील मुख्याधिकारी व फलटणचे तहसीलदार हे बेकायदेशीररित्या फलटण शहरातील अतिक्रमणे पाडत आहेत, फलटण शहरात चाललेली ही मोहीम म्हणजे मनमानी कारभार असल्याची टीका ॲड. नरसिंह निकम यांनी केली.
फलटण येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये अतिक्रमण मिहिमेच्या विरोधात व्यापारी वर्ग एकत्रित आले होते. त्यावेळी फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, तुकाराम गायकवाड, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मंगेश दोशी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष वसीम मणेर, भाजपाचे जेष्ठ नेते रवींद्र फडतरे, रिपाईचे जिल्हा सचिव विजय येवले, भाजपा शहराध्यक्ष अमोल सस्ते, राजेश हेंद्रे, आझाद समाज पार्टीचे मंगेश आवळे,विद्यार्थी परिषदेचे रोहित राऊत यांच्यासह विविध संघटनाचे पदाधिकारी, व्यापारी, महिला, युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
फलटण नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना मी जाहीर आवाहन करतो की, तुम्ही जी अतिक्रमण हटाव मोहीम राबवत आहे, ती टाऊन प्लॅनिंग ॲक्ट नुसार आहे का? संबंधित डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याने अतिक्रमण घोषित केले आहे का ? याचा सर्वे झाला आहे का? टाऊन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांनी नकाशे तयार करून तसे आदेश दिले आहेत का? जर नकाशे तयार नसतील, मोजण्या झाल्या नसतील तर फलटण नगरपरिषदेचे सीओ आणि फलटण तालुक्याचे तहसीलदार हे ब्रह्मदेव आहेत का? असा सवाल ॲड. नरसिंह निकम यांनी यावेळी केला.
मुख्याधिकाऱ्यांनी सांगायचे की हे अतिक्रमण आहे, मग अधिकाऱ्यांनी ती पडायची, मुख्याधिकाऱ्यांनीच ठरवायचे की कोणतं अतिक्रमण आहे व कोणतं अतिक्रमण नाही, एखाद्या धनदांडग्याने अतिक्रमण केलेले असले तरी मुख्याधिकारी यांना दिसत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात देखील या मोठया बिल्डिंगचा जिना अतिक्रमणात आहे, परंतु तो मुख्याधिकारी यांना दिसत नाही. काल आम्ही मुख्याधिकारी आणि अधिकाऱ्यांना येथे बोलवून विचारणा केली होती, की कोणाच्या आदेशाने तुम्ही अतिक्रमण पाडत आहात, तुम्हाला कोणाचे आदेश आहेत, परंतु त्याचा जाब कोणीही दिला नाही. यांना नगर विकास खात्याकडून किंवा टाउन प्लॅनिंग अधिकाऱ्यांकडून आदेश आले आहेत का? किंवा हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत का? असतील तर आम्ही आमची अतिक्रमणे हाताने पाडून टाकू, परंतु तुमच्याकडे जर आदेश नसेल तर तुम्ही अतिक्रमणाची मोहीम थांबवली नाही तर येथे आमच्या रक्ताचे पाठ वाहिले तरी चालतील परंतु एकही बांधकाम आम्ही पाडू देणार नाही इशारा नरसिंग निकम यांनी यावेळी दिला.
अतिक्रमण बाबत सध्या शासनाचा जीआर आला आहे, परंतु त्यामध्ये ग्रामीण भागातील गायरान जमिनीवर केलेले अतिक्रमण काढावे असे स्पष्ट म्हटले, असताना मुख्याधिकारी व तहसीलदार फलटण शहरातील अतिक्रमणे काढत आहेत. मुख्याधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फत सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या निषेधार्थ उद्या रविवारी फलटण शहर बंद करण्याची घोषणा व्यापाऱ्यांनी केली आहे आणि सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन झालेल्या अन्यायावर आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागणार असल्याचे नरसिंह निकम यांनी जाहीर केले.
व्हाट्सअपवर आदेश सोडून, फलटण शहरात जी अतिक्रमण हटाव मोहीम मुख्याधिकारी यांनी सुरु केली आहे. त्यांनी अतिक्रमण धारकांना आधी पूर्व कल्पना देणे गरजेचे होते परंतु एका रात्रीत मेसेज व्हायरल करून जी ही मोहीम सुरु केली आहे, ती पूर्णता बेकायदेशीर आहे. कोणताही आदेश नसताना मुख्याधिकारी हे अतिक्रमणे काढण्याचे काम करत आहेत. जर ही मोहीम थांबवली नाही तर आगामी काळामध्ये पुढील होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी दिला.
नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी बळजबरी करून सुमारे तीन वर्षांपूर्वी आमचे अतिक्रमण पाडले आहे. मुख्याधिकारी यांनी नगरसेवक व सत्ताधारी मंडळींमुळे अतिक्रमण हटाव मोहीम सुरु केलेली आहे. ज्या इमारतीला पुर्णत्वाचा दाखला देण्यात येतो, त्या इमारतीस पार्किंग नसते, असे खोटे दाखले देण्याचे कारण फक्त मुख्याधिकारी व पालिका कर्मचारी आहेत. आगामी काळामध्ये जर मुख्याधिकारी यांनी आपला मनमानी कारभार थांबवला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असे मत माजी नगरसेवक तुकाराम गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केले.
कोणातीही मोहीम सुरु करण्याआधी दुकानदारांना पूर्व कल्पना नोटीस देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अतिक्रमण काढताना त्या व्यावसायिकांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. या दोन्ही गोष्टी सुद्धा नगरपालिकेने केलेल्या नाहीत. ही अतिक्रमण हटाव मोहीम बेकायदेशीर असून, तुमच्या दुकानाच्या पायरीला, तुमच्या दुकानाच्या पत्र्याला नगरपालिकेने हात लावला नाही पाहिजे. यासाठी तुम्ही सर्वांनी निकम वकिलांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. तुम्ही ठाम राहिलात तर आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असे माजी नगरसेवक सचिन अहिवळे यांनी सांगितले.
अतिक्रमण हटाव मोहिमेच्या विरोधात आम्ही सर्वजण एकत्र आलो असून, फलटण बंद हा सर्वांनी शंभर टक्के पाळावा व सोमवारी बहुसंख्येने जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागण्यासाठी यावे असे आवाहन रिपाईचे जिल्हा सचिव विजय येवले यांनी केले.
No comments