आजपासून फलटण येथे ‘फलटण तालुका संस्कृती महोत्सव’
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१५ -: ‘फलटण तालुका संस्कृती महोत्सव’ नावाचा आगळावेगळा ‘उपक्रम’ मकर संक्रांतीचा मुहूर्त साधून दिनांक 16 व 17 जानेवारी 2023 रोजी फलटणच्या ‘महाराजा मंगलकार्यालया’त साजरा होणार आहे. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेची फलटण शाखा यांच्या सहकार्याने परिसंवाद - मुलाखती - गप्पा आणि स्थानिक समाजसंस्कृतीचे प्रदर्शन असे या महोत्सवाचे स्वरूप आहे, अशी माहिती ‘थिंक महाराष्ट्र’चे पूर्णवेळ कार्यकर्ते नितेश शिंदे व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या संस्कृती महोत्सवाबाबत सविस्तर माहिती देताना त्यांनी सांगितले की, महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांच्या उपस्थितीत दि.16 रोजी सकाळी 10:30 वाजता होणार आहे. या कार्यक्रमास थिंक महाराष्ट्र डॉट कॉमचे मुख्य संपादक दिनगर गांगल यांची सन्माननीय उपस्थिती राहणार आहे.
या महोत्सवात चार चर्चात्मक परिसंवाद आयोजित केले असून दि.16 रोजी सकाळी 11 वाजता अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत ‘युवा पिढी आणि लोकशाही मूल्ये’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, पत्रकार स्वप्नील शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सत्यजीत गुरव, पत्रकार प्रगती जाधव - पाटील, अधिवक्ता अॅड.सुस्मिता धुमाळ सहभागी होणार आहेत. मुंबई विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.दीपक पवार हे या परिसंवादाचे संवादक असणार आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे समाजाच्या विविध स्तरांत ‘लोकशाही गप्पा’ नावाचा कार्यक्रम नियमित होत असतो. हा परिसंवाद त्यांतील नववे पुष्प आहे. यावेळी प्रथमच हा कार्यक्रम तालुका स्तरावर जाऊन पोचला आहे.
दि.16 रोजी दुपारी 4 वाजता ‘वेध स्त्रीजीवनाचा’ या परिसंवादात श्री गोविंदकाका उपळेकर महाराज समाधी मंदिर ट्रस्टच्या सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, प्रगत शिक्षण संस्थेच्या सचिव डॉ.मंजिरी निंबकर, स्वयंसिद्धा महिला संस्था समूहाच्या अध्यक्षा अॅड.सौ.मधुबाला भोसले या सहभागी होणार असून अंजली कुलकर्णी या त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
महोत्सवाच्या दुसर्या दिवशी दि.17 रोजी सकाळी 11 वाजता ‘फलटणची उद्योगभरारी’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला असून यामध्ये गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्टस् प्रा.लि; चे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, निंबकर अॅग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक पद्मश्री डॉ.अनिल राजवंशी, श्री सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, के.बी.एक्सपोर्ट प्रा.लि; चे संचालक सचिन यादव सहभागी होणार आहेत. परिसंवादाचे प्रास्ताविक पत्रकार प्रसन्न रुद्रभटे करणार असून प्रा.सतीश जंगम संवाद साधणार आहेत.
दि.17 रोजी दुपारी 3 वाजता ‘स्थानिक मनोरंजनाच्या ग्लोबल हाका’ या विषयावर आयोजित परिसंवादात साहित्यिक वसीमबारी मणेर, मुधोजी महाविद्यालयाचे प्रा.अशोक शिंदे, आयडियल किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या प्रमुख वैशाली शिंदे सहभागी होणार असून त्यांच्याशी साहित्यिक प्रा.नितीन नाळे संवाद साधणार आहेत.
या महोत्सवात दोन दिवस स्थानिक समाज संस्कृतीचे दर्शन घडवणारे प्रदर्शन मांडले जाणार असून निवडणूक अधिकार्यांच्या कार्यालयातर्फे लोकशाही मूल्यांच्या व नागरिकांच्या हक्काच्या गोष्टी सांगणारे वेगवेगळे स्टॉल असतील. ‘कमला निंबकर बालभवन’ यांच्या प्रकल्पाचा स्टॉलही प्रदर्शनात असेल. त्यामध्ये फलटणच्या सामाजिक व सांस्कृतिक प्रश्नांबाबत शाळेने केलेल्या पाहणीतील निरीक्षणे दृश्यात्मक पद्धतीने मांडण्यात येणार आहेत. त्याखेरीज फलटण तालुक्यातील लेखक व कवी यांच्या प्रकाशित पुस्तकांचे दालन उपलब्ध करुन देण्यात येणार असून त्याचे संयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद, फलटण शाखेचे कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे व प्रमुख कार्यवाह अमर शेंडे यांनी केले आहे.
ग्लोबल वातावरणात व आधुनिक लोकशाही मूल्यांच्या संदर्भात स्थानिक संस्कृतीचा वेध घ्यावा हा या महोत्सव आयोजनामागील मुख्य हेतू आहे.त्यातून पारंपरिक भारतीय मूल्ये आणि आधुनिक लोकशाही मूल्ये यांतील संगती-विसंगती ग्रामीण संस्कृती संदर्भात तपासून पाहिली जाणार आहे. ‘थिंक महाराष्ट्र’च्या वतीने महाराष्ट्राच्या सुमारे पंचेचाळीस हजार खेड्यांतील माहिती संकलन करण्याचा प्रयत्न आहे. सध्या पाच तालुक्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यात फलटण तालुक्याचा समावेश आहे. ‘थिंक महाराष्ट्र’ची उद्घोषणा महाराष्ट्राची प्रज्ञाप्रतिभा व चांगुलपणा यांचे नेटवर्क ‘थिंक महाराष्ट्र-लिंक महाराष्ट्र’अशी आहे, असेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
No comments