Breaking News

सातारा एमआयडीसीतील कचऱ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावा - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

Solve the problem of garbage in Satara MIDC immediately - Collector Ruchesh Jayavanshi

    सातारा  : सातारा येथील औद्योगीक वसाहत व कोडोली धनगरवाडी गावातील कचऱ्याचा प्रश्न  तातडीने मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगीक विकास महामंडळ, ग्रामपंचयात व उद्योजक यांनी समन्वयाने काम करावे. एमआयडीसीने त्यासाठीचा प्रस्ताव पाठपुरावा करुन लवकरात लवकर मंजूर करुन आणावा अशा सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केल्या.

    जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठकसंपन्न झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. या बैठकीला उपवनसंरक्षक महादेव मोहिते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेशचंद्र दंडगावार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, विविध उद्योगांचे मालक, प्रतिनिधी उपस्थित होते.

    सातारा-रहिमतपूर रोड मार्गावर नो पार्कींगचे फलक लावण्यात आले आहेत. नो पार्कींगमध्ये जी वाहने पार्क करतील त्यांच्यावर कारवाई करा, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले, जुन्या व अतिरिक्त औद्योगीक क्षेत्राकरिता फायर स्टेशनची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. ग्रामपंचायत कोडोली व धनगरवाडी क्षेत्रामध्ये कचरा टाकतात. हा कचरा संबंधित ग्रामपंचायतीने उचलावा. तसेच विविध उद्योगांमध्ये महिला काम करीत आहेत. त्यांच्यासाठी महिला विशेष बस सेवा सुरु करावी.

    कृष्णा नदी माहुली येथे केटीवेअर बंधारा बांधण्याची मागणी आहे. याबाबत स्वतंत्र बैठक लावावी, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले,  एमआयडीसीतील विविध उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईएसआयसी हॉस्पीटलची मान्यता मिळाली आहे. जेथे जागा उपलब्ध आहेत तेथे हॉस्पीटल उभारणीची कार्यवाही करावी.   कोरेगावच्या नगर पंचायतीने पाणी योजनेकरिता उद्योजकांसाठी उभारलेल्या डिपीवरुन वीज जोडणी घेतली आहे हा डीपी उद्योगांना असून नगर पंचायतीने स्वतंत्र डी.पी घ्यावा.

    औद्योगिक विकासाच्या लाभामध्ये स्थानिकांना योग्य वाटा मिळावा या उद्देशाने सर्व औद्योगिक घटकांमध्ये पर्यवेक्षकीय श्रेणी किमान 50 टक्के व पर्यवेक्षकीयसहीत इतर श्रेणतील किमान 80 टक्के स्थानिक उमेदवारांना नोकरी देण्यात यावी. याची जिल्ह्यातील सर्व उद्योगांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. तसेच जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील जे-जे प्रश्न उपस्थित करण्यात आले व प्रलंबित आहेत ते प्रश्न सोडविण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी बैठकीत सांगितले.

No comments