Breaking News

मालमत्तेच्या ‘मोह’जालातून तलाठ्याने केला ‘झोल’? कोळकीत एकाच जमिनीचे दोन सात-बारे

Talathi made a fortune from the property scam? 

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 13 : कोळकी ता. फलटण येथे मालमत्तेच्या मोहजालातून अनेक 'झोल' झाले असल्याचे समोर येत आहे. सुमारे  ७० ते ८० च्या दशकातील तलाठी अरुण देशपांडे यांच्या कार्यकालात हे 'झोल' झाले असल्याचे सांगतात. विशेष म्हणजे ज्या मालमत्तेच्या कागदपत्रात त्रूटी आढळतात, तेथे तत्कालीन तलाठी देशपांडे यांच्या नातेवाईकांची व त्यांच्या निकटवर्तीयांची नावे असल्याचे दिसत आहे. दरम्यान, देशपांडे यांच्या कार्यकालात झालेल्या या 'झोल'मुळे सध्या फलटण तालुक्यातील महसूल कार्यालय खडबडून जागे झाले असून तत्कालीन तलाठी देशपांडे यांच्याकडून मालमत्ता विकत घेणारे खातेदार देखील आता डोक्याला हात लावून बसले आहेत.

श्रींमत विक्रमसिंहराजेंनी अवघ्या २ हजारात दिली जागा
    कोळकी गावातील सर्व्हे नं. १२१/१ब/१ब/१अ या जागेवरुन सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसते. मात्र, समजलेली वस्तुस्थिती अशी आहे, सर्व्हे नं. १२१/१ब/१ब/१अ याठिकाणी ८१ गुंठे जागा आहे. वास्तविक ही जागा कै. श्रीमंत विक्रमसिंहराजे मालोजीराजे नाईक निंबाळकर यांची होती. श्रीमंत विक्रमसिंहराजे यांनी ही जागा दि. १० ऑगस्ट १९७८ साली गजानन पांडुरंग भोकरे यांना खरेदीदस्त करुन दिली. अवघ्या दोन हजार रुपयांना कै. श्रीमंत विक्रमसिंहराजे यांनी ही जमिन दिली. त्यानूसार दि. २२ सप्टेंबर १९७८ रोजी तत्कालीन मंडलाधिकार्‍यांनी हा दस्त नोंदवला. त्यानूसार १६२४१ फेरफार क्रमांकाने गजानन पांडुरंग भोकरे यांचा सातबारा देखील तयार झाला. 
तलाठ्यांनी केली स्वत:च्या वडिलांच्या नावाची नोंद

    त्यानंतर दि. ७ सप्टेंबर १९७९ रोजी फक्त एका अर्जाद्वारे पुन्हा फेरफार तयार करण्यात आला. व फेरफार क्रमांक १६७५२  प्रमाणे तलाठी अरुण देशपांडे यांचे वडील गोपाळ हणुमंत देशपांडे यांच्या नावे सात बारा तयार झाला. नोंदणी कायद्याप्रमाणे रक्ताचे नाते नसताना मालमत्ता हस्तांतरीत झाली असल्याचे इथे दिसत आहे. तलाठी अरुण देशपांडे यांनी स्वत:च्या फायद्यासाठी ही नोंद केली होती का? असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे. 

तहसिलदारांचा बिनशेती आदेश
    त्यानंतर दि. १० सप्टेंबर १९८१ रोजी तहसिलदारांनीही या सर्वे नंबरसह आजूबाजूची काही मालमत्ता बिनशेती करण्याचा आदेश काढला. आय. एन. डी./आय. आय./ एन. ए./ एस. आर.-२१ याप्रमाणे सदरची मालमत्ता बिनशेती झाली. दि. ३ ऑगस्ट १९८२ रोजी फेरफार क्र. ३४ ने ही मालमत्ता बिनशेती म्हणून नोंद करण्यात आली आहे. 

थेट खरेदीदारांच्या नावे सात-बारा झालाच कसा?
    मालमत्ता बिनशेती झाल्यानंतर ज्यांची मालमत्ता आहे, त्यांच्या मालमत्तेचे स्वतंत्र सातबारे त्यांच्याच नावे तयार होतात. (असा नियम आहे) व मूळचा जो एक सातबारा असतो, तो रद्द करण्यात येतो. पण, या प्रकरणात तसे झालेले दिसत नाही. तत्कालीन तलाठ्यांनी हे सात बारे थेट खरेदीदारांच्या नावे केल्याचे समोर येत आहे. सोबतच मूळचा जो एकच सातबारा आहे, तो रद्द करण्यात आला नाही. सध्या या जागेचे दोन सातबारे ऑनलाईन दिसत असून मुळचा सातबारा व खरेदीदारांचे वेगवेगळे सात-बारे येथे दिसत आहेत. 

 देशपांडे यांना स्वत:ची मालकी सिद्ध करणे कठीण
    दरम्यानच्या काळात या जागेलगत असणारे मुगुटराव शिंदे व देशपांडे यांचे चतु:सिमेवरुन वादंग झाले. हा वाद फलटण, सातारा आणि मुंबई उच्च न्यायालयापर्यंत गेला. या न्यायालयीन प्रकरणात देशपांडे यांना ही वादग्रस्त जागा नावावर कशी झाली? हे सिद्ध करता आले नाही. म्हणून तीन्हीही न्यायालयाने त्यांचे अपिल फेटाळून लावले होते. 

भोकरे यांची जागा त्यांच्याच नावे हवी

    मुंबई उच्च न्यायालयाने १९९७ साली दिलेल्या निर्णयानंतर देशपांडे यांनी इतरत्र कोठेही धाव घेतलेली नाही. याउलट देशपांडे यांच्या काही कागदपत्रांनूसार ही जागा भोकरे यांच्याच मालकीची असायला हवी, असे सांगितले आहे. दि. १ जून २०१९ रोजी देशपांडे यांच्या वारसांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केलेल्या तक्रार अर्जानूसार ही जमिन भोकरे यांचीच आहे, हे स्पष्टपणे कबूल केलेले आहे. दि. १५ मार्च २०२२ रोजी देशपांडे यांच्या वारसाने फलटणच्या उपविभागीय अधिकार्‍यांकडे केलेल्या एका अपिलात देखील हे मान्य केलेले आहे. 

२ हजाराची जागा ४० लाख रुपयांना परत घेतली 
    हे प्रकरण अद्याप येथे संपलेले नाही. दरम्यान, १९९५ साली कै. श्रीमंत विक्रमसिंहराजे नाईक निंबाळकर यांनी ज्यांना जमिन विकली होती, ते गजानन पांडुरंग भोकरे हे गृहस्थ परत आले. आणि जमिनीचा ताबा आपल्याला अद्यापही मिळालेला नाही, म्हणून माझे पैसे मला परत द्या, असे म्हणू लागले. म्हणून दि. १५ मार्च १९९५ साली कै. विक्रमसिंहराजे यांनी गजानन भोकरे यांना त्यांचे चिरंजीव प्रमोद व त्यांचे बंधू सुर्यकांत भोकरे यांच्या साक्षीने २५ हजार रुपये माघारी दिले. तशी पावती देखील  आहे. त्यानूसार भोकरे हे जमिन देण्यास तयार आहेत. तसे प्रतिज्ञापत्र दि. २३ मार्च २०२२ रोजी भोकरे यांनी तहसिलदारांना दिले आहे. याखेरीज कै. विक्रमसिंहराजे नाईक निंबाळकर यांचे वारस श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी माणुसकीच्या नात्याने भोकरे यांच्या वारसांना ४० लाख रुपये देखील चेकने दिले आहेत. त्यानूसार कै. विक्रमसिंहराजे नाईक निंबाळकर यांच्या वारसांना भोकरे यांनी जमिन देणे क्रमप्राप्त ठरत आहे.

No comments