Breaking News

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा फलटण तालुक्याच्या दौऱ्यावर

Union Home Minister Ajay Kumar Mishra on a visit to Phaltan Taluka

     फलटण : भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा हे दि. ५  व ६ जानेवारी रोजी फलटण तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. फलटण शहरासह तालुक्यात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

    भारतीय जनता पार्टीच्या मिशन २०२४ ची सुरवात नुकतीच करण्यात आली असून ही मोहीम आता फलटणमध्ये सुद्धा आली असून यामध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांच्याकडे फलटणची जबाबदारी दिली असल्याचे सांगण्यात आले आहे. या दौऱ्यात खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, राज्य प्रवास संयोजक माजी आमदार बाळा भेगडे, सोलापूर जिल्हाध्यक्ष आ. सचिन कलयाणशेटटी, सातारा जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, लोकसभा प्रभारी माजी आमदार प्रशांत परिचारक, लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत. 

      २०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीसाठी भाजप सज्ज आहे. त्यासाठीच त्यांनी नव्या  ‘मिशन १४४’ ची घोषणा केली आहे. या ‘मिशन १४४’ ची सुरुवात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा महाराष्ट्रात चंद्रपुर येथून करणार आहेत. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला असणाऱ्या फलटणमध्ये भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांनी फलटणमध्ये दोन दिवसांचा भरगच्च कार्यक्रम आखला आहे.

       भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा हे दि. ५ जानेवारी रोजी सोलापूर येथून सायंकाळी ६ वाजता कोळकी येथील जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहावर येणार आहेत, तेथून कोळकी येथील शासकीय रास्त भाव दुकानला भेट देणार आहेत. सायंकाळी ६.३० वाजता राष्ट्रीय पदक विजेती कु. देविका घोरपडे हिचा ब्राम्हण गल्ली येथील निवासस्थानी यथोचित सत्कार करणार आहेत. सायंकाळी ७.२० वाजता विचार परिवार समन्वय कार्यक्रमास त्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सायंकाळी ७.४५ वाजता मारवाड पेठ येथील श्रीकृष्ण मंदिरामध्ये उपस्थित राहुन दर्शन घेणार आहेत. त्यानंतर रात्री ८.२० वाजता कोळकी येथे लोकसभा कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर सोयीनुसार हॉटेल जॅक्सन इन येथे मुक्कासाठी जाणार आहेत.

       भाजप वरिष्ठ नेते व केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा हे दि. ६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता निंभोरे येथे राष्ट्रीय महामार्ग कामाच्या गुणवत्तेची पाहणी करणार आहेत. सकाळी ९.१५ वाजता मलठण येथील श्री सद्गुरु हरिबुवा महाराज मंदिरात उपस्थित राहुन दर्शन घेणार आहेत. सकाळी १०.३० वाजता फलटण येथील प्रशासकीय कार्यालयांना भेट देणार आहेत व सातारा जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत. यांनतर सकाळी ११.४५ वाजता रिंगरोड येथील जनऔषधी केंद्राला भेट देणार आहेत. दुपारी १२.३० वाजता केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना लाभार्थी यांच्याशी महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी १.३० वाजता महाराजा मंगल कार्यालय येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ०२.१५ वाजता मंगळवार पेठ येथे सचिन अहिवळे यांच्या निवासस्थानी सामाजिक दुर्बल घटकातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे सदिच्छा भेट देणार आहेत. दुपारी ३ वाजता फरांदवाडी येथे जल जीवन मिशनचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे,  त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर पुणेकडे मार्गस्थ होणार आहेत.अशी माहिती मंडल अध्यक्ष बजरंग गावडे व शहराध्यक्ष अमोल सस्ते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

No comments