Breaking News

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांची आबासाहेब मंदिर - श्रीकृष्ण मंदिरास भेट

आबासाहेब मंदिर येथे महाआरती करताना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा समवेत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर  
Union Home Minister Ajay Kumar Mishra visits Abasaheb Mandir - Shri Krishna Mandir

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ५ डिसेंबर  - भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहराज्य मंत्री ना. अजयकुमार मिश्रा आज (गुरुवार) पासून २ दिवस फलटण दौऱ्यावर असून आज सायंकाळी ७.३० वाजता सोलापूर येथून फलटण येथे पोहोचताच त्यांनी फलटणचे उपनगर समजले जाणाऱ्या कोळकी येथील शासनमान्य रास्त भाव दुकानास भेट दिली आणि त्यानंतर लगेच येथील पुरातन श्री आबासाहेब मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले व महाआरती केली.

      यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, आ. राम सातपुते, माजी मंत्री बाळा भेगडे, प्रशांत परिचारक, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी शिंदे, तहसीलदार समीर यादव, नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सातारा व सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

      शासनमान्य रास्त भाव दुकानास भेट देवून पाहणी केली. यावेळी सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार मालाचा पुरवठा केला जावा, अशी अपेक्षा ना. अजयकुमार मिश्रा यांनी व्यक्त केली. 

    पुरातन श्री आबासाहेब मंदिरात दर्शन घेतल्यानंतर महाआरती केली,  श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टच्यावतीने केंद्रीय गृह राज्य मंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांचे आणि खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सह अन्य मान्यवरांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून यथोचित स्वागत ट्रस्टचे अध्यक्ष व अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष प. पू. महंत श्यामसुंदर शास्त्री विद्वांस बाबा यांनी केले.

    यावेळी सुदामराज बाबा विद्वांस, सीताराम बाळू शिंदे, किसन रुस्तुम शिंदे, अर्जुनराव महादेव नाळे, बाळासाहेब दयाराम ननावरे, सदाशिव धोंडीबा शिंदे हे विश्वस्त मंडळ सदस्य तसेच महानुभाव पंथातील अनेक मान्यवर, मठाधिपती आणि सन्यासी, उपदेशी, समाजबांधव, शासकीय अधिकारी, शहरवासीय उपस्थित होते.

     मंदिरातील आरती व दर्शनानंतर ना. अजयकुमार मिश्रा यांनी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व अन्य मान्यवरांसह सुवर्ण पदक विजेती राष्ट्रीय खेळाडू कु. देविका घोरपडे यांच्या निवासस्थानी जाऊन अभिनंदन व सत्कार केला. त्यानंतर विचार परिवार समन्वय कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लावून शासकीय विश्राम धाम येथे पोहोचले.

      दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी शिंदे, शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक दादासाहेब शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन शिंदे, पोलिस उप निरीक्षक गणेश माने यांच्या सह त्यांचे सहकारी अधिकारी पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

No comments