Breaking News

सीआयडी अधिकारी असल्याची बतावणी करून वृद्धाला लुटले ; १ लाखाचे दागिने लंपास

An old man was robbed by pretending to be a CID officer

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ - सीआयडी अधिकारी असल्याची बतावणी करून वृद्धाची फसवणूक करत, वृद्धाच्या गळ्यातील सोन्याची चैन व सोन्याची अंगठी असे, १ लाख रुपये किंमतीचे दागिने हातचलाखी करून लुटून नेल्याची घटना, फलटण मधील बँक ऑफ इंडियाच्या समोरील रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ३१ जानेवारी २०२३ रोजी  सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास  बापु मारुती ननावरे वय ७३ वर्षे  हे फिरण्यासाठी गेले होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, फलटण येथून बँक ऑफ इंडियाच्या समोरील रस्त्यावरून घरी येत असताना, लाल रंगाच्या मोटारसायकलवरील अनोळखी इसमाने त्यांना थांबवून, मी सीआयडी (CID) चा अधिकारी आहे, अशी बतावणी करून, ननावरे यांना ओळखपत्र दाखवले व मी एका आरोपीचा शोध घेत आहे, असे म्हणून ननावरे यांना एका इसमाचा फोटो दाखवला. व म्हणाला, ती व्यक्ती चोर आहे, तरी तुमच्या जवळ काय काय आहे, ज्या काही मौल्यवान वस्तु असतील, त्या रुमालात बांधून खिशात ठेवा, असे त्याने ननावरे यांना सांगितले, त्यानंतर त्याने ननावरे यांच्याकडून रुमाल घेवून त्यात त्यांची सोन्याची अंगठी, सोन्याची चैन, मोबाईल, घड्याळ, पाकीट हे साहित्य टाकल्यानंतर रुमालाची गाठ बांधून ननावरे यांच्या हातात दिली व तो तेथून निघून गेला. ननावरे पुढे गेल्यानंतर मात्र त्यांना संशय आल्याने रुमालाची गाठ सोडून पाहिली असता, रूमालात मोबाईल, घड्याळ व पैश्याचे पाकीट एवढेच दिसले, अंगठी व गळ्यातील चैन दिसली नाही, त्या अज्ञाताने हातचलाखी करून ननावरे यांची  अंगठी व गळ्यातील चैन,  घेवून गेला असल्याचे ननावरे यांच्या लक्षात आले. सीआयडी अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या अज्ञात इसमाने ननावरे यांच्याकडील ४० हजार रुपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व ६० हजार रुपये किंमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हातचलाखी करून लुटून नेली व ननावरे यांची फसवणूक केली असल्याची फिर्याद बापु मारुती ननावरे रा. स्वामी विवेकानंद नगर, फलटण यांनी दिली आहे.

No comments