Breaking News

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वाठार निंबाळकर फाटा येथे चक्का जाम आंदोलन

वाठार निंबाळकर फाटा येथे चक्का जाम आंदोलनात सहभागी संघटनेचे पदाधिकारी यांना ताब्यात घेताना फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी
Chakka Jam Movement of Swabhimani at Wathar Nimbalkar Phata

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २२ - स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हा शाखेच्या माध्यमातून आज (बुधवार) रोजी दुपारी फलटण - सातारा रस्त्यावर वाठार निंबाळकर फाटा (चिंचपाटी), ता. फलटण येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले, काही काळ वाहतूक थांबली मात्र पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. 

      वीज बील थकबाकी साठी कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याची प्रक्रिया त्वरित थांबवावी, वीज वितरण कंपनीने मीटर रीडिंग प्रमाणे योग्य बीले द्यावीत ती भरण्यास आम्ही तयार आहोत मात्र चुकीची वीज बीले आम्ही भरणार नसल्याचे ठणकावून सांगत त्या चुकीच्या वीज बील थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित केल्यास वीज वितरण कंपनी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी यावेळी दिला आहे.

      वीज दर नियामक आयोगाने सुचविलेली ३७ % दर वाढ रद्द करावी, कृषी पंपांची सदोष वीज बिले दुरुस्त करुन मिळावीत,  शेतीसाठी दिवसा १२ तास अखंडित वीज पुरवठा मिळावा, ऊसाला एक रक्कमी एफ आर पी मिळावी, ऊस तोडणी साठी ५ ते १० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या मुकदमांवर खंडणीचे गुन्हे दाखल करावेत, नियमीत कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान त्वरित जमा करावे आदी मागण्यांसाठी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी  राज्यभर चक्का जाम आंदोलन  पुकारले असून त्याचाच एक भाग म्हणून सातारा जिल्ह्यात सदर आंदोलन पुकारण्यात आल्याचे यावेळी धनंजय महामुलकर यांनी सांगितले.

     फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव यांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यभर आज चक्का जाम आंदोलन छेडण्यात आले असून फलटण तालुक्यात या आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी आंदोलन सुरु राहणार असून अखंडित वीज पुरवठा, ३७ % वीज दर वाढीचा प्रस्ताव रद्द करणे, ऊस वजन काटे ऑनलाईन करावेत, ऊस तोडीसाठी पैसे मागणाऱ्या मुकादमांवर खंडणीच्या गुन्हे दाखल करावेत वगैरे मागण्यांसाठी सनदशीर मार्गाने आंदोलन सुरु राहणार असल्याचे नितीन यादव यांनी सांगितले.

No comments