स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे २२ रोजी चक्का जाम आंदोलन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २० : स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हा शाखेच्या माध्यमातून बुधवार दि. २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.१० वाजता फलटण - सातारा रस्त्यावर वाठार निंबाळकर फाटा (चिंचपाटी), ता. फलटण येथे चक्का जाम आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
कृषी पंपांची वीज जोडणी त्वरित थांबवावी, वीज दर नियामक आयोगाने सुचविलेली ३७ % दर वाढ रद्द करावी, कृषी पंपांची सदोष वीज बिले दुरुस्त करुन मिळवीत, शेतीसाठी दिवसा १२ तास अखंडित वीज पुरवठा मिळावा, ऊसाला एक रक्कमी एफ आर आर मिळावी, ऊस तोडणी साठी ५ ते १० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या मुकदमांवर खंडणीचे गुन्हे दाखल करावेत, नियमीत कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान त्वरित जमा करावे आदी मागण्यांसाठी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यभर चक्का जाम आंदोलन बुधवार दि. २२ फेब्रुवारी रोजी पुकारले असून त्याचाच एक भाग म्हणून सातारा जिल्ह्यात सदर आंदोलन पुकारण्यात आल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
पत्रकावर संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, जिल्हा सरचिटणीस रविंद्र घाडगे, फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव, युवा आघाडी राज्य प्रवक्ता प्रमोद गाडे, पक्ष तालुकाध्यक्ष दादा जाधव, शहराध्यक्ष सचिन खानविलकर, पक्ष उपाध्यक्ष शकील मणेर, सोमंथळी शाखाध्यक्ष बाळासाहेब शिपकुले, प्रल्हाद अहिवळे, शिवाजी सोडमिसे, निखिल नाळे, शशिकांत नाळे, नारायण अभंग, किसन शिंदे, पिंटू भापकर, राहुल कदम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
No comments