वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे आठ दिवसांत पूर्ण करा - पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा दि. 24: पाटण तालुक्यात वन्यप्राण्यांमुळे झालेले शेतीचे नुकसान व पशुहानी यांचे पंचनामे आठ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पाटण तालुक्यातील वन्य प्राण्यांमुळे शेती व जीवितांच्या होणाऱ्या हानीबाबत करावयाच्या उपाययोजनांविषयी आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.
यावेळी बैठकीस जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक उत्तम सावंत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कृषि, वन आणि महसूल विभागाने संयुक्त पंचनामे करुन त्याचा अहवाल सादर करावा, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, गवे, रानडुक्कर यांच्याकडून पाटण तालुक्यात शेतीचे नुकसान होत आहे तसेच कोयना नदी काठावरील मगरींच्या वावरांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. याविषयी वन विभागाने कारवाई करावी. झालेल्या शेतीचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसान भरपाईची कार्यवाही तातडीने करावी. त्यासोबतच सौर कुंपण बसविण्याचे प्रस्तावही लवकर तयार करुन सादर करावा.
यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांनी आतापर्यंत झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यामध्ये सह्याद्री व्याघ्रप्रकल्पांतर्गत आतापर्यंत 176 पीक नुकसानीच्या घटना झाल्या असून पशुधन नुकसानीच्या घटना 59 व 2 जण वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती प्रकल्पाचे उपसंचालक श्री. सावंत यांनी दिली. या सर्व घटनांमध्ये मिळून एकंदर 16 लाख 85 हजार 9 रुपयांचे नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तर पाटण वन परिक्षेत्रामध्ये 794 पीक हानीचे व 299 पशुहानीचे प्रकरणे असून या सर्व प्रकरणांमध्ये 55 लाख 13 हजार 425 रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली असल्याची माहितीही श्री. सावंत यांनी दिली.
No comments