Breaking News

धोम बलकवडी कालवा बारमाही होणार ; सोळशी - महाबळेश्वर येथे धरण ; वरंधा घाटातून बोगद्याद्वारे पाणी नीरा देवघरमध्ये - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

Dhom Balkawadi canal will be perennial; Dam at Solshi - Mahabaleshwar - MP Ranjitsinh Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २४ - महाबळेश्वर तालुक्यातील सोळशी या ठिकाणी लवादाची अडचण येणार नाही अशा पद्धतीने धरण होऊन, अडवलेले पाणी सोळशी धरणातून बोगद्याद्वारे धोम बलकवडी धरणात सोडू शकतो, त्याद्वारे धोम बलकवडीचा कालवा बारमाही होऊ शकतो, वरंधा घाटातील धबधब्यातील ओव्हर फ्लो द्वारे वाया जाणाऱ्या पाण्यापैकी ०.९ टीएमसी पाणी आपण अडवू शकतो आणि ते बोगद्याद्वारे निरा देवघर धरणामध्ये घेऊ शकतो. तसेच महाबळेश्वर येथील वेण्णा लेकचे वाया जाणारे पाणी देखील आपल्याला सातारा जिल्ह्यात आणता येईल आशा विविध योजना द्वारे पाणी  आणण्याचा आपला प्रयत्न सुरू असून, यासाठी तज्ञ समितीचा सल्ला घेत आहे, त्या दृष्टीने सीडब्ल्यूसी कडून सॅटॅलाइट सर्वेक्षण झाले आहे.  या सर्व योजना कार्यान्वित करून,  फलटणसह माढा लोकसभा मतदारसंघाचा दुष्काळ हटवण्याचा आपला प्रयत्न असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

    फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    धोम बलकवडीचा  आठमाही वाहणारा कालवा बारमाही करण्याच्या दृष्टीने महाबळेश्वर तालुक्यातील सोळशी या ठिकाणी धरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लवादाची अडचण येणार नाही अशा पद्धतीने ०.९ टीएमसी क्षमतेचे धरण होऊन पाणी आडवू शकतो. सोळशी धरणातून बोगद्याद्वारे धोम बलकवडी धरणात पाणी सोडू शकतो, त्याद्वारे धोम बलकवडीचा कालवा बारमाही होऊ शकतो, त्या दृष्टीने समितीने सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर  नीरा खोऱ्यामध्ये अद्यापही अडीच टीएमसी पाणी सापडेल,असे सीडब्लूसी चे म्हणणे असून, ते अडीच टीएमसी पाणी आपण अडवलं तर, एक टीएमसी पाणी वीर धरणात सोडून, पुढे ते पाणी उजणीद्वारे माढा मतदारसंघात  वापरता येणार आहे, हे पाणी अडवण्यासाठी आपल्याला जादा खर्च येणार नसल्याचे खासदार रणजीतसिंह यांनी यावेळी स्पष्ट केले.

    महाबळेश्वर येथील वेण्णा लेक तलाव तीन दिवसात भरून वाहतो, उर्वरित पाणी वाया जाते, ते पाणी देखील आपल्याला सातारा जिल्ह्यात आणता येईल व त्याचा वापर करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत.  त्याचबरोबर वरंधा घाटातील धबधब्यातील ओव्हर फ्लो द्वारे जाणाऱ्या पाण्यापैकी ०.९ टीएमसी पाणी आपण अडवू शकतो आणि ते पाणी १४०० मीटर बोगद्याद्वारे निरा देवघर धरणामध्ये घेऊ शकतो.  त्या दृष्टीने सीडब्ल्यूसी कडून सॅटॅलाइट सर्वेक्षण झाला असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.

    मी काही भूगोल तज्ञ नाही किंवा जलतज्ञ नाही, मी कुठल्याही प्रकारचा तज्ञ नाही, परंतु मी एक सर्वसामान्य शेतकरी असून, माझ्यामध्ये क्युरॅसिटी आहे. पावसाचे पडलेले पाणी कसे अडवावे, त्याचा उपयोग कुठे करावा, याचा विचार करूनच मी, यावर काम सुरू केले आहे,  या कामी तज्ञांचा सल्ला घेऊन, योजना मार्गी लावणार आहे. महाबळेश्वर सोळशी या ठिकाणी होणाऱ्या धरणाचा सर्व्हे पूर्वी झालेला असून, त्याची फाईल  निरादेवघर योजनेसारखीच बाजूला पडली होती. मी ते धरण होण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे खासदार रणजीतसिंह यांनी सांगितले.

    फलटण शहरामधून जाणाऱ्या पालखी महामार्गाचे काम येत्या काही महिन्यात सुरु होईल व २०२३-२४ पूर्वीच ते काम पूर्ण होणार आहे. शहरातून जाणाऱ्या पालखी मार्गाबाबत विरोधकांकडून  अफवा  पसरवल्या जातील, परंतु हा पालखी मार्ग करताना एकही दुकान व घर काढणार नाही. रस्ता आहे आहे एवढाच राहणार आहे. त्याचे फक्त काँक्रीटीकरण व मजबुतीकरण होणार असल्याचे खा.रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.

No comments