Breaking News

शेती पंपाची वीज कनेक्शन तोडली जाणार नाहीत - केंद्रीय ऊर्जा समिती सदस्य खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

    

Electricity connection of farm pumps will not be cut - Central Energy Committee member MP Ranjitsinh Naik Nimbalkar

     फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २२ -  केंद्रीय ऊर्जा समितीमध्ये खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा समावेश झाला असून, या समितीच्या माध्यमातून फलटण विभागातील वीजेच्या सर्व तक्रारी दूर करण्याबरोबर आगामी काळात येथे जादा वीज उप केंद्र, जादा ट्रान्स्फर सेंटर्स, जुन्या वीज वाहक तारा बदलणे यासह पुरेसा व योग्य दाबाने वीज पुरवठा होण्यात कोणतीही अडचण राहणार नाही याची ग्वाही खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.

    वीज वितरण कंपनीच्या फलटण विभागातील तक्रारी विशेषतः वीज बिल वसुली साठी खंडित होणारा वीज पुरवठा, ट्रान्सफॉर्मर जळाल्याने निर्माण होणाऱ्या अडचणी बाबत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण विभागीय कार्यालयात बैठक लावून कार्यकारी अभियंता आवळेकर व त्यांच्या सहकारी अधिकारी यांच्या समवेत चर्चा करुन  नेमकी अडचण जाणून घेतली आणि त्यावर योग्य तोडगा काढून वीज ग्राहकांची अडचण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

     उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नुकतेच फलटण तालुक्यासाठी ३०० ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करुन दिले असल्याने प्रत्येक वाडी वस्ती व गावातील जळालेले ट्रान्सफॉर्मर त्वरित बदलून द्या, अन्य काही अडचणी असतील तर त्या प्राधान्याने सोडवा, चालू वीज बिल भरले असेल तर मागील थकबाकीचे कारण देवून शेती पंपाचा  वीज पुरवठा खंडित करु नका असे स्पष्ट निर्देश यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले आहेत.

     दि. १९ फेब्रुवारी पूर्वी जळालेले किंवा चोरीस गेलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या जागी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले असून वीज पुरवठा सुरळीत झाल्याचे यावेळी सांगण्यात आले तथापी आज १०० केव्हीए क्षमतेचे ५८ ट्रान्सफॉर्मर उपलब्ध होत असून गरज असेल तेथे ते बसवा पण कोणाचाही वीज पुरवठा खंडित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

     अखंडित व योग्य दाबाने वीज पुरवठा होण्यासाठी फलटण तालुक्यात नवीन ३ वीज उपकेंद्र उभारण्याबाबत आपण मागणी केली असून त्यापैकी २०० के व्ही ए क्षमतेचे एक वीज उपकेंद्र नाईकबोमवाडी औद्योगिक वसाहती साठी उभारण्यात येणार असल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

     फलटण तालुक्यातील तब्बल शंभरहून अधिक ट्रान्सफॉर्मरची चोरी झाली असून, वीज चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे, त्यावर अधिकारी व कर्मचारी लक्ष देत नाहीत मात्र गरीब शेतकऱ्यांवर आकडा टाकला की कारवाई करीत आहात आणि मोठ्या शेतकऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही,  असा दुजाभाव का व कशासाठी असे व अनेक प्रश्न उपस्थित करीत या सर्व प्रश्नांची सोडवणूक करुन वीज ग्राहक व अधिकाऱ्यांचा योग्य समन्वय घडवून आणून कोणाही शेतकरी अथवा वीज ग्राहकाची यापुढे अडचण होणार नाही यासाठी योग्य दक्षता घेण्याच्या सूचना खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.

        यावेळी फलटण विभागाचे कार्यकारी अभियंता आवळेकर व त्यांचे सहकारी अधिकारी तसेच निवृत्त सनदी अधिकारी व दिशा समितीचे सदस्य विश्वासराव भोसले, भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, भाजप तालुकाध्यक्ष बजरंग गावडे,  सचीन अहिवळे, लतीफ तांबोळी, वसीम मणेर, मनोज कांबळे पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments